भाजपचे नेते, नगरसेवकच खंडणीखोरीत आघाडीवर

40

ठाणे/भाईंदर – भगवा झेंडा हातात घेऊन कुणी खंडणी वसूल करणार असेल तर ते सहन करणार नाही, अशी घसाफोड वल्गना करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्येच खंडणीखोरांच्या टोळ्या कशा आघाडीवर आहेत याचा पोलीस रेकॉर्डच चव्हाटय़ावर आला आहे. भाजपचे खंडणीखोर आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच मीरा-भाईंदरमध्ये भाजप नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी खंडणीखोरीत कसे नंबर वन आहेत याचा पर्दाफाश झाला असून हे पुरावे बघितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कोणते प्रायश्चित्त घेणार, असा सवाल मीरा-भाईंदरवासी करीत आहेत.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा ढोल पिटणाऱया भाजपचा फुगा साफ फुटला आहे. भाजप नेत्यांच्या खंडणीखोरीच्या गुह्यांनी मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यातील स्टेशन डायऱया भरून गेल्या आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या खंडणीखोरीचे प्रकरण मीरा-भाईंदरमध्ये सध्या जोरात गाजत आहे. बांधकाम व्यावसायिक विनोद त्रिवेदी यांचे येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर असलेल्या ब्रह्मदेव मंदिरासमोर इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. वाढीव बांधकाम करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्रिवेदी यांनी महापालिकेत अर्ज केला. मात्र आमदार नरेंद्र मेहता यांनी अधिकाऱयांना हाताशी धरून ही परवानगी रोखून धरली होती. या परवानगीसाठी आमदार मेहता यांनी त्रिवेदी यांच्याकडे थेट खंडणीची मागणी केली. दोन कोटी रुपये दिले तरच परवानगी मिळेल, अशी धमकी मेहता यांनी त्रिवेदी यांना दिली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही काहीही होत नसल्याने अखेर त्रिवेदी यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. मेहता यांच्यावर न्यायालयाने बडगा उगारल्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले असले तरीही मेहता यांना अद्याप अटक झाली नसून ते मोकाट आहेत.

भाजपचा ‘बलात्कारी’ सभापतीही मोकाट

सभ्यतेचा आव आणणाऱया भाजपच्या नेत्यांनी थेट महिला कार्यकर्तीच्या अब्रूवरच घाला घातला आहे. भाजपचे प्रभाग समितीचे सभापती अनिल भोसले यांनी बलात्कार केल्याची तक्रार पंधरा दिवसांपूर्वी भाजपच्या एका कार्यकर्तीने पोलिसांत दाखल केली आहे. भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊनही त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. भोसले हे अद्यापही मोकाट आहेत.

आमदाराच्या भावावरही तिवरांच्या कत्तलीचा गुन्हा

खंडणीखोर आमदार नरेंद्र मेहता यांचा भाऊ विनोद मेहता याने तिवरांची बेछूट कत्तल करून खार जमीन बुजवत सरकारचा कायदा धाब्यावर बसविला आहे. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेत विनोद मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र विनोद मेहता हेही अद्याप मोकाटच आहेत.

हे पहा कारनामे….

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे सात-आठ वर्षांपूर्वी नगरसेवक असताना एका बेकायदा गाळ्याचे बांधकाम करणाऱयाकडून त्यांनी २५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर ही लाच घेताना नरेंद्र मेहता यांना ऍण्टी करप्शनच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणातून सुटण्यासाठी मेहता गेली आठ वर्षे कोर्टाच्या वाऱ्या करीत होते.

नरेंद्र मेहता यांनी एक भूखंड शाळेसाठी आरक्षित केला. या भूखंडावर टेक्निकल स्कूल बांधण्याची परवानगी मिळाली, मात्र मेहता यांनी टेक्निकल स्कूल न बांधता केवळ शाळा बांधली. इतकेच नव्हे तर शाळेखाली गाळे बांधून ते भाडय़ाने दिले. टेक्निकल शाळा बांधण्याची परवानगी असताना ती का बांधली नाही यासाठी मेहता यांच्याकडून शिक्षण खात्यासह अन्य खात्यांनी खुलासे मागितले आहेत.

राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक तिवारी यांनाही बेकायदा बांधकामप्रकरणी एक लाख रुपयांची खंडणी घेताना अटक करण्यात आली होती. आता हे तिवारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या गळ्यातील ताईत आहेत. तिवारींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांनाही बेकायदा बांधकामासाठी एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गेल्या वर्षी ऍण्टी करप्शन खात्याच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्या घरावर छापे टाकले असता त्यांच्या लॉकरमधून दहा लाखांची रोकड मिळाली होती. वर्षा भानुशाली या सध्या जामिनावर सुटल्या आहेत.

भाजपचे ‘बलात्कारी’ सभापती अनिल भोसले यांनी काशीमिरा येथील महापालिकेच्या शाळेत आपल्या बगलबच्च्यांना घेऊन ‘गटारी’ साजरी केली होती. शाळेतच दारू, मच्छी-मटण, चाकण्याचा जंगी बेत आयोजित केला होता. याप्रकरणी पालिका आयुक्तांनी भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

भाजपचे स्थायी समितीचे सभापती प्रशांत केळुस्कर यांना भाईंदर पूर्वेकडील एका इमारतीच्या खाली जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत काय?

खंडणीखोर आमदार नरेंद्र मेहता, ‘बलात्कारी’ सभापती अनिल भोसले आणि आमदार मेहता यांचे भाऊ ‘खारफुटी कत्तलफेम’ विनोद मेहता या सर्वांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अटक कुणालाही झालेली नाही. पोलीस भाजपच्या या गुन्हेगार नेत्यांना अभय देत आहेत. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीच पाठीशी घालत आहेत काय, हाच मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार आहे काय, असा संतप्त सवाल मीरा-भाईंदरवासी करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या