
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली. पडळकरांनी केलेले वक्तव्य संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भाजप या प्रकाराचे कधीही समर्थन करणार नाही. पडळकर यांना समज देण्यात आली आहे. त्यांच्या विधानामुळे अजित पवार यांचे मन दुखावले असल्याने त्यांची जाहीर माफी मागतो, असे बावनकुळे यांनी सांगितले. शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देण्यासाठी बावनकुळे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, ‘‘महायुती असून वेगळे विचार असू शकतात. मतभेद असले तरी मनभेदातून क्यक्तिगत टीका करणे हे राज्याच्या संस्कृतीत नाही. भाजपच्या संस्कृतीलाही हे शोभणारे नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर अजित पवारांबाबत जे काही बोलले त्याबाबत मी जाहीर माफी मागतो.’’