चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा, पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बांधल्याचा जावई शोध

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा असल्याचे त्यांच्या ट्विटमधून निदर्शनास आले आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी पतितपावन मंदिराला भेट दिली होती. त्याची छायाचित्र ट्विटरवर टाकून त्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली असे ट्विट केले आहे. मात्र प्रत्यक्षात पतितपावन मंदिर कुणी बांधले हा इतिहास चित्रा वाघ यांना माहीत नाही.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सांगण्यानुसार श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर बांधले, हा इतिहास चित्रा वाघ यांना माहीत नसावा. पतितपावन मंदिराच्या दारातच एका फलकावर या मंदिराचा लिहिलेला इतिहास चित्रा वाघ यांनी वाचला असता तर त्यांच्या ज्ञानात भर पडली असती.

25 नोव्हेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीत संयुक्त दौरा केला. त्यावेळी त्यांनी पतितपावन मंदिराला भेट देत दर्शन घेतले. पतितपावन मंदिरातील दर्शनाची छायाचित्रे चित्रा वाघ यांनी ट्विटरवर टाकली आहेत.

‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे हिंदुस्थानातील पहिले मंदिर’, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. हे ट्विट करताना चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा असल्याचे दिसून आले आहे.

पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच मंदिराचा इतिहास सांगणारा फलक लावण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सांगण्यानुसार श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरीच्या वरच्या आळीत वीस गुंठे जागा विकत घेत दीड लाख रूपये खर्च करून पतितपावन मंदिर उभारले, असा या मंदिराचा इतिहास आहे. मात्र चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा असल्याने त्यांनी ट्विटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर बांधल्याचा उल्लेख केला आहे.