महिला खेळाडूंच्या तक्रारींची दखल घेतलीच पाहिजे, भाजपच्या महिला खासदाराचे कुस्तीपटूंना समर्थन

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. लैंगिक शोषणाविरोधात या महिला खेळाडूंनी हे आंदोलन केलं असून ते दडपण्याचा प्रयत्नही होताना दिसत आहे. दरम्यान, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देऊन कुस्तीपटूंना समर्थन दिलं आहे.

बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांना कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे म्हणाल्या की, महिला खेळाडूंच्या तक्रारीची दखल घेतली जायला हवी. ती तशी घेतली जात नसेल, तर लोकशाहीत ही घटना नक्कीच स्वागतार्ह नाही. यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

‘एक महिला खासदार म्हणूनच नव्हे तर जन्माने महिला असल्याने हे माझं मत आहे की कुठल्याही महिलेची जेव्हा अशी तक्रार येते तेव्हा त्याची दखल घेतली गेली पाहिजे. दखल घेऊन त्या तक्रारीची तपासणी करावी आणि ती तक्रार योग्य आहे किंवा अयोग्य आहे, ते चौकशी समितीने किंवा ज्यांना ते अधिकार दिलेले असतील त्यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा. पण, महिलांच्या तक्रारीची दखल ही घेतली जायलाच हवी आणि जे काही असेल ते लवकरच जगापुढे यायला हवं, असं मला वाटतं’, अशी प्रतिक्रिया खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.