भाजप आमदार आशीष देशमुख यांचा सरकारच्या नावाने ठणाणा

41
वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने अर्धातास धुमाकूळ घातला होता.

सामना ऑनलाईन, नागपूर

सतत तीन दिवसांपासून होणाऱया गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मात्र सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठीही वेळ नाही. शेतशिवारावर मरणकळा आली आहे. शेतकरी भुकेकंगाल झाला आहे, परंतु सरकार मात्र आपल्याच धुंदीत मशगूल असल्याने संतप्त झालेला शेतकरी आज रस्त्यावर उतरला. भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अमरावती महामार्गावर रास्ता रोको करून सरकारच्या नावाने ठणाणा केला. वर्ध्यातही शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे तब्बल २० किमीपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला.

तुफान गारपीटीने विदर्भासह मराठवाडय़ात तीन दिवसांपासून थैमान घातले आहे. नागपूर, अमरावती, वाशिम, बुलढाणा आदी भागात या गारपिटीने शेतशिवारावर मरणकळा आणली आहे. संत्र्याच्या बागांमध्ये नावालाही फळ शिल्लक राहिले नसून उघडीबोडकी झाडे पाहून शेतकरी उन्मळून पडला आहे. गहु, हरभराही आडवा झाला आहे. उरल्यासुरल्या कापसाच्या अवकाळीने वाती झाल्या असून भविष्याच्या चिंतेने शेतकरी काळवंडून गेला आहे. तीन दिवसांपासून गारपीट होत असताना सरकार मात्र आकडेवारीचा खेळ करण्यातच मशगूल आहे. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुलढाण्यात जुजबी पाहणी करून सोपस्कार उरकला. गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठीही सरकारकडे वेळ नसल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

आशीष देशमुख यांचा स्वकीयांविरोधात एल्गार

नागपूर-अमरावती महामार्गावर आज सकाळी ८ वाजता हजारो शेतकरी उत्स्फूर्तपणे गोळा झाले. या शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने शिमगा करत गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करीत स्वपक्षाच्या सरकारविरोधातच एल्गार पुकारला. शेतकऱ्यांच्या या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनाचे हे लोण वर्धा जिल्हय़ातही पसरले. हेट्टीकुंडी येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तब्बल २० किमीपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

संत्र्याच्या बागेत पानही राहिले नाही

खापरी येथील शेतकरी शेषराव डोंगरे यांची संत्रा बाग गारपिटीने नामशेष झाली आहे. बागेतील झाडांना अक्षरशः पानही शिल्लक राहिले नाही. शेतातील पॉली हाऊसचीही वाताहत झाली आहे. खापरी येथीलच सतीश चव्हाण, राजु गोरे, महेश किणेकर, विजय घागरे आदी संत्रा उत्पादकही गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहेत. चंदनपार्डी येथे रवी गुंड, सुरेश रबडे तर चिंचोली येथे मुरलीधर साठे यांच्या बागाही गारपिटीने नेस्तनाबूत झाल्या.  आज नांदेड व लोहा तालुक्यात सोनखेड, सेलवाडी, पळशी, बामणी परिसरात दुपारी गारांचा खच पडला. सकाळपासूनच आभाळात काळय़ा ढगांनी दाटी केली होती.  दुपारी अवकाळी पावसासह गारा पडल्या. गारपिटीचा जोर एवढा होता की गहू, हरभरा, ज्वारीने माना टाकल्या.   हातातोंडाशी आलेला घास डोळय़ादेखत उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाला. या गारपिटीने परिसरातील हजारो हेक्टरवर नासाडी केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

परळीत अवकाळी पाऊस

दोन दिकसांपासून बीड जिल्हय़ात अवकाळी पावसाने मंगळवारी परळीतही हजेरी लावली. दुपारपर्यंत वाताकरण साधारण होते. मात्र, दुपारी २ वाजेनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ झाले होते. पुढे सायंकाळी ५ च्या सुमारास गारांसह पावसास सुरुवात झाली. १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसाने सर्वसामान्यांची दाणादाण उडाली.

तिसऱया दिवशीही गारपीट! शेतकऱयांच्या डोळय़ात महापूर

गारपिटीने मराठवाडय़ात मुक्कामच ठोकला आहे. आज तिसऱया दिवशीही नांदेड व बीड जिल्हय़ांना गारपिटीने झोडपून काढले. या अस्मानी संकटाने शिवारातील उभी पिके आडवी झाली असून भविष्याच्या चिंतेने शेतकऱयांच्या डोळय़ात महापूर आला आहे.

मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत

गारपिटीमुळे मृत झालेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत, तर गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना ३० हजारांची मदत देणार असल्याचे पाणीपुरवठामंत्री व जालना जिल्हय़ाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. ११ तारखेला मराठवाडा तसेच विदर्भामध्ये झालेल्या गारपिटीमुळे चार जणांना जीक गमवावा लागला. जालना जिल्हय़ात कंजार उमरद गाकात नामदेव शिंदे तर निवडुंगा गावात आसाराम जगताप या दोन वृद्धांचा मृत्यू झाला होता. दरम्यान शेतकऱयांच्या मृत्युमुखी पडलेल्या पशुधनालासुद्धा ३० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे आश्वासनदेखील सरकारच्या वतीने लोणीकरांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या