भाजपचा ‘नाराज’ आमदार योग्य वेळी राजीनामा देणार, पण…

41

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

काटोल येथील भारतीय जनता पार्टीचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी योग्य वेळी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आशिष देशमुख यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीमध्ये पकडून काढलेली ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपूरमध्ये पोहोचली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सरकारने वेगळा विदर्भ दिला नाही तर माझ्या सोबत भाजपचे अनेक आमदार राजीनामा देतील, असे वक्तव्य देशमुख यांनी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या या यात्रेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मात्र स्वागत होताना दिसत आहे.

चंद्रपुरात दाखल झालेल्या ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’निमित्त आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्या पत्राचे उत्तर न मिळाल्याने आपला मुख्यमंत्र्यांवरील विश्वास उडाला आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यांनी ७ वेळा विधानसभेत वेगळा विदर्भ विषय मांडला आहे. ४ वर्षे आधी मुख्यमंत्र्यांना असलेली विदर्भाविषयीची तळमळ हरवली आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत भाजपमधील अनेक आमदार अस्वस्थ असल्याने ही खडखड येत्या काळात प्रकर्षाने पुढे येईल, असेही ते म्हणाले.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करून खासदारकी व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या