भाजपचे काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात – जयंत पाटील

1653

भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी हा दावा केला आहे. एकीकडे जयंत पाटील यांनी हा दावा केला, तर दुसरीकडे भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार यांची भेट घेतली. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

भाजपचे काही आमदार जे राष्ट्रवादीतून तिकडे गेले, जे दुखावले आहेत किंवा पराभूत झाले आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ते संपर्क करत आहेत. ते मतं व्यक्त करत आहेत की आमच्याकडून चूक झाली, आम्ही जर असे केले नसते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यापेक्षा जास्त संख्येने आले असते, असे खासगीमध्ये सर्वजण कबूल करत आहेत. आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

एकीकडे जयंत पाटील यांनी हा दावा केला असतानाच भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी जाऊन भेट त्यांची घेतली. काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांनी भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या