टोलनाक्यावर भाजप आमदाराची दादागिरी, कर्मचाऱ्याला केली मारहाण

18
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या मंत्र्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच त्यांच्याच एका आमदाराने टोलनाक्यावर दादागिरी केली. त्याने टोल कर्मचाऱ्याला कानफटवल्याचे समोर आले आहे. महेंद्र यादव असे या आमदाराचे नाव आहे.
मुरादाबाद-बरेली महामार्गावरील टोलनाक्यावर अवसान सिंह या टोल कर्मचाऱ्याने यादव यांची गाडी अडवली. यामुळे संतप्त झालेल्या यादवांनी त्याच्या श्रीमुखात भडकवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे. अद्याप त्या मुजोर आमदारावर कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
१७ एप्रिलला सीतापूरचे आमदार महेंद्र यादव आपल्या लवाजम्यासह बरेलीहून येत होते. महामार्गाच्या वाटेवर असलेल्या टोलनाक्यावर  सिंह या कमर्चाऱ्याने त्यांची गाडी अडवली. यादव यांनी आपला परिचय देताच त्यांना पुढे जाऊ देण्यात आले. यादव यांच्या सुरक्षा रक्षकाने स्वतःच त्यांच्या गाडीसाठी रस्ताही मोकळा करुन दिला. त्यानंतर सिंहने रस्ता बंद करण्यासाठी बॅरिकेड्स लावले. यामुळे यादव यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या मागेच राहील्या. या प्रकाराने संतप्त झालेले यादव गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्याच्या कानाखाली सटासट वाजवली. त्यानंतर बॅरिकेड्स स्वतःच बाजूला हटवून ते परत त्या कर्मचाऱ्याकडे वळले आणि त्यांनी त्याला मारत मारत गाडीच्या मागे नेले. त्याचवेळी संधी साधून सिंह याने तिथून पळ काढला आणि आपला जीव वाचवला. त्यानंतर मोठ्या ऐटीत यादव आपल्या तीन गाड्यांच्या ताफ्याला घेऊन पुढे निघाले.
दरम्यान ही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे टोल प्रकल्पाचे व्यवस्थापक वैभव शर्मा यांनी सांगितले. त्यांनी पोलिसात तक्रारही  केली आहे. पण अद्याप तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या