सरकारविरोधात भाजप आमदाराचे बेमुदत ठिय्या आंदोलन

30

सामना ऑनलाईन । नागपूर

गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांनी यावं अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या तसेच विदर्भातील गारपीटग्रस्त व बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, या मागणीसाठी भाजपचे काटोल येथील आमदार डॉ. आशिष देशमुख व परिसरातील शेकडो शेतकरी बुधवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे देशमुख यांनी म्हटलं आहे.

समोवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचा खच पडला होता. गारांमुळे परिसरातील अनेक लोक जखमी झाले व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकऱ्यांची जनावरेही गारपिटीमुळे जखमी झाली. गेल्या २ दिवसांत विदर्भात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्र, मोसंबी, लिंबू, फळबागा आणि भाजीपाल्याचे हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले. त्यामुळे गारपिटीच्या व पावसाच्या भीतीने विदर्भातील शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत. मात्र शेतकऱ्यांना मदत व पंचनामे सोडाच, उलट सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आमदार देशमुख आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

कापसावर यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात मात्र काटोल, नरखेड, मौदा, कळमेश्वर व रामटेक या पाच तालुक्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेच नाही, असे म्हटले आहे. हे सर्वेक्षण चुकीचे आहे. पुन्हा सर्वेक्षण व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या