सामूहिक हत्याकांडप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा झालेला भाजप आमदार फरार

29

सामना ऑनलाईन । अलाहाबाद

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 22 वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक हत्याकांड प्रकरणी निकाल दिला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील हमीरपूरचे भाजपचे आमदार अशोकसिंह चंदेल यांना आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. चंदेल यांच्यासह 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भाजपचे आमदार चंदेल फरार झाले आहेत.

26 जानेवारी 1997 मध्ये हमीरपूरच्या गजबजलेल्या बाजारात पाच जणांची हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडात भाजप नेते राजीव शुक्ला यांचा भाऊ राकेश शुक्ला, राजेश शुक्ला, पुतण्या अंबुज शुक्लासह खासगी सुरक्षा रक्षक वेद नायक आणि श्रीकांत पांडे यांची हत्या करण्यात आली होती. तसेच या घटनेत तीन जण जखमी झाले होते. या हत्याकाडांत ठार झालेला अंबूज फक्त 9 वर्षांच्या होता. या हत्याकाडांने देशभरात खळबळ उडाली होती. दोन नेत्यांमधील राजकीय संघर्षातून हे हत्याकांड झाले होते.

22 वर्षापूर्वीच्या या हत्याकांडाच्या सुनावणीला अनेकदा वेगळे वळण मिळाले. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने भाजप आमदार चंदेल यांच्यासह इतर 10 जणांना मुक्त केले होते. या निकालानंतर न्यायाधीश आर.बी. लाल आणि अश्वनी कुमार यांच्यावर लाचखोरीचे आरोप झाले. त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयात हे प्रकरण नेले. प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर 22 फेब्रुवारी 2019 रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने भाजप आमदार चंदेल यांच्यासह 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी चंदेल मुख्य आरोपी होते. तर आरोपी अजय सक्सेना दोन्ही पक्षांकडून मुख्य साक्षीदार होते. या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले चंदेल1989 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1993 मध्येही ते आमदार झाले. तर 1999 मध्ये चंदेल बसपाकडून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2017 मध्ये भाजपच्या तिकीटावर ते आमदार म्हणून निवडून आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या