भाजप आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

1156

पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथील भाजप आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज (सोमवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार असलेल्या महेश लांडगे यांच्यावर शहर भाजपची धुरा आहे. मागील काही दिवसांपासून त्यांचा बाहेर मोठ्या प्रमाणात वावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना ते त्यांच्यासोबत होते. कोविड रुग्णांसाठीच्या वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती.

त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे. त्यांनी चार दिवसांपूर्वी महापालिकेतील अधिका-यांशी देखील चर्चा केली होती. आयुक्तांच्या अॅन्टी चेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यामुळे किती जणांची तपासणी करावी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भोसरी मतदारसंघातील माजी विरोधी पक्षनेते असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या