पक्षाच्या पराभवामुळे भाजप आमदार आनंदात, ऑडिओ क्लिप व्हायरल

35

सामना ऑनलाईन। जयपूर

राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीत भाजप पराभूत झाल्याने पक्षात नाराजीचा सूर उमटत असतानाच भाजपच्याच एका आमदाराला मात्र भन्नाट आनंद झाल्याचे समोर आले आहे. ग्यानदेव आहुजा असे या आमदाराचे नाव आहे. भाजपच्या पराभवावर आनंद व्यक्त करतानाची त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात तो जसं केलं तसंच फेडावं लागणार असल्याचं आपल्या कार्यकर्त्याला सांगत आहे.

आहुजा यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात बंड पुकारलं असून याबद्दल त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पत्रही पाठवलं आहे. यात राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसनं मोठया फरकानं विजय मिळवला होता. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने पक्षश्रेष्ठींनी राजेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आहुजा यांचे आयतेच फावले होते. आपला हा आनंद त्यांनी गाणं गुणगुणत व्यक्त केला होता. राजेंना उद्देशून बोलताना तूने, वैसा ही भरेगा,तेरी बदी का बदला, तूझको यहीं मिलेगा.. असे म्हणत मी तर ४० हजारांनी पराभूत झालोय तरीही मस्त मौला आहे, हरफनमौला आहे. पराभवानं सरकार बदनाम, जसवंत बदनाम. आम्ही थोडेच पराभूत झालोत, निवडणुकांमध्ये तर सरकारचा पराभव झाला आहे. असे आहुजा म्हणत असल्याचं ऐकायला येत आहे. तसंच त्यानंतर कार्यकर्त्याला वेट अँड वॉच असंही आहुजा यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या