भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडितेची CBI चौकशीची मागणी

rape
प्रातिनिधिक फोटो

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार महेश नेगी यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोपी एका महिलेने केला आहे. या महिलेने नेगी यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी महिलेने उत्तराखंड सरकारला पत्र लिहिले आहे. राज्यातील पोलिसांकडून होणाऱ्या तपासावर आपला विश्वास नसून या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जावी असी मागणी तिने या पत्राद्वारे केली आहे.

पीडितेची कायदेशीर बाजू एसपी सिंह नावाचे वकील भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तराखंड सरकारने पीडितेच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सिंह यांनी केली आहे. कोरोनामुळे सचिवालयात सर्वसामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे महिलेने तिची मागणी ईमेलद्वारे गृह सचिवांकडे केली आहे. याशिवाय पोस्टाद्वारेही तिने गृहसचिवांना पत्र पाठविले आहे.

पीडीत महिलेच्या तक्रारीवरून नेगी आणि त्यांच्या पत्नीविरोधात 6 सप्टेंबरला बलात्काराचा आणि त्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेने आरोप केला आहे की नेगी यांनी तिच्यावर 16 ऑगस्टला बलात्कार केला होता. पीडितेचं म्हणणं आहे की तिच्या मुलीचा पिता हा नेगी हेच आहेत. तिने आपला दावा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी DNA चाचणी करण्याचीही मागणी केली आहे.

महेश नेगी हे अल्मोडा जिल्ह्यातील द्वाराहाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पीडितेने गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की पोलिसांनी सुरुवातीला तिच्यासमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवला होता. पोलीस हे नेगी यांचा बचाव करत असून यामुळेच आपला त्यांच्यावर विश्वास नसल्याचे पीडितेने म्हटले आहे. पीडितेने आरोप केला आहे की नेगी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आपण हे सगळं षडयंत्र रचल्याचे नेगींच्या बायकोने म्हटले होते. पोलीस अधीक्षक श्वेता चौबे यांनी मात्र पीडितेने पोलिसांवर केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. पोलीस निष्पक्षपणे तपास करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या