कर्नाटकात कोण होणार मुख्यमंत्री? भाजप विधिमंडळाच्या बैठकीत आज होणार निर्णय

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या राज्यातील विधिमंडळ सदस्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.

येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले बसवराज एस बोम्मई म्हणाले की, आज संध्याकाळी सात वाजता खासगी हॉटेलमध्ये पक्षातील विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये राज्यातील नवीन मुख्यमंत्री बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

येडियुरप्पा हे कर्नाटकात मोठ्या संख्येने असणाऱ्या लिंगायत समाजाचे नेते आहेत. लिंगायत समाजातील प्रभावशाली नेत्याला मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्याबाबत भाजपमध्ये विचारमंथन सुरु आहे, असे बोलले जात आहे. येडियुरप्पा यांचे उत्तराधिकारी म्हणून जी नावे चर्चेत आहेत, त्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी, बीएल संतोष आणि विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा सहभाग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या