भाजप आमदाराच्या पीएची पोलीस निरीक्षकाला मारहाण

25

सामना प्रतिनिधी । नागपूर

जिल्ह्यातील उमरेडचे भाजप आमदार सुधीर पारवे यांच्या पीएने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (एएसआय) मारहाण केल्याची घटना उमरेड येथे उघडकीस आली. आमदारांचा पीए व पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर तब्बल १८ तासांनी उमरेड पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गर्जे हे कुटुंबासह वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील गिरड येथील बाबा फरीद दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येताना उमरेडनजीकच्या मंगरूळ शिवारात देवाळकर पेट्रोलपंपजवळ त्यांची गाडी पंक्‍चर झाली. चालक गाडीचे चाक काढत असताना ते रस्त्यावर आले. याच दरम्यान आमदार सुधीर पारवे यांची गाडी येथून जात होती. त्याची धडक आमदाराच्या गाडीला लागली. यावरून आमदाराचा पीए किशोर हजारे याने पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दाम्पत्याला मारहाण केली. यावेळी आमदार सुधीर पारवे गाडीत बसलेले होते.

या प्रकारानंतर पोलिस अधिकाऱ्याची पत्नी संजीवनी अजय गर्जे (४४) यांनी उमरेड पोलीस ठाण्यात आमदाराच्या पीएविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदाराच्या पीएनेही पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. अजय गर्जे यांच्या पत्नी संजीवनी या रामटेक येथे शिक्षिका आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून किशोर हजारे व पाच अनोळखी व्यक्तींविरोधात कलम १४३, १४७, ३२३, १४९, २९४, ५०६ आणि ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या