धक्काबुक्कीमागे राष्ट्रवादीचे षड्यंत्र, भाजप आमदार देशमुख यांचा आरोप

सामना प्रतिनिधी । माजलगाव

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे आयोजित साठे जयंती उत्सव कार्यक्रम आटोपून परत निघालो असता त्या दरम्यान घडलेला प्रकार दुर्दैवी असून लोकप्रतिनिधी या नात्याने आपण त्या लोकांना माफ केले आहे. या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल करणार नसल्याचे भाजप आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे षड्यंत्र असू शकते असे त्यांनी सांगितले.

वाचा नक्की काय घडले होते : आमदार आर. टी. देशमुख यांच्यावर हल्ला

राजेवाडी येथे बुधवारी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमात आमदार देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान ते परत निघाले असता येथील जिल्हापरिषद शाळेजवळ गावातील राष्ट्रवादीच्या महिला उपसरपंचाचा पती रामेश्वर थेटे, दीपक महागोविंद, भाऊसाहेब पवार, माऊली महागोविंद, ईश्वर थेटे, सुखदेव कुरे यांच्यासह 25 ते 30 जणांनी गाडी अडवली. आमच्या गावात चार वर्षात एकही विकास काम का केले नाही? तसेच बंधाऱ्याचे काम का केले नाही? असे म्हणत आमदारांना घेराव घालत गाडीतून खाली खेचून त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या पीएचा मोबाईल खेचून घेऊन फोडला व गाडी चालकाला देखील मारहाण केली. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक तात्काळ धावून आले व त्यांना आमदारांच्या भोवती कडे करून तेथून बाजूला आणले.

दरम्यान सायंकाळी आमदार आर.टी. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘मी राजेवाडी येथून परत निघालो असता हा प्रकार घडला.मी त्यांना समजून सांगत असताना सवर्ण-दलित असा वाद होऊ नये याची काळजी घेतली व वाद होऊ दिला नाही. येथील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.