भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते दीर्घकाळ आजारी होते आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून तारासिंह यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सरदार तारासिंह यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी भाजपच्याच काही नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिल्यानं लोकांना ही बातमी खरी वाटली होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरूनच तारासिंह यांची प्रकृती चिंताजनक असली तरीही स्थिर आहे असे ट्विट करत उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला होता. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती आणि अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

kirit-somaiyya-tarasing-tweet

4 वेळा आमदारकी भूषवलेल्या सरदार तारासिंह यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या ऐवजी मुलुंड मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. 1984 ते 1999 या कालावधीत तारासिंह हे मुंबई महानगरपालिकेवर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1999 नंतर सलग 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून येत राहिले. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत तारासिंह यांनी काँग्रेसच्या चरणसिंह सप्रा यांचा पराभव केला होता. महाराष्ट्रामध्ये दोन पंजाबी उमेदवारांमध्ये झालेली ही लढत अत्यंत चुरशीच्या लढतींपैकी एक मानली जात होती.

आपली प्रतिक्रिया द्या