कानाखाली मारेन! भाजप आमदाराची अधिकाऱ्याला धमकी

1140

गुजरातमधील भाजपचे आमदार मधु श्रीवास्तव यांनी सरकारी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे. बडोद्यातील वाडी भागात हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यावरून झालेल्या वादानंतर श्रीवास्तव यांनी अधिकाऱ्याला ही धमकी दिली. या कामात अधिकारी मुद्दाम विलंब करत असल्याचा आरोप श्रीवास्तव यांनी केला. मात्र, संबंधित विभागाच्या परवानगीशिवायच श्रीवास्तव यांनी मूर्ती निर्माण करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. श्रीवास्तव यांनी अधिकाऱ्याला धमकी दिल्यानंतर गुजरातमधील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजप आमदार केतन इनामदार आणि राज्यातील भाजप अध्यक्ष जीतू वाघाणी यांच्यात या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यादरम्यान श्रीवास्तव राजीनामा देणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर काही तासातच यू टर्न घेत आपण राजीनामा देणार नसल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. तसेच कोणताही अधिकारी आपल्याकडे आल्यास त्याला कानाखाली मारू असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. राज्यात विकासकामे झपाट्याने होत आहेत. मात्र, धर्माशी संबिधित कामांना उशीर होत असल्याचा आरोप श्रीवास्तव यांनी केला. अधिकारी जाणूनबुजून अशा फाइल दाबून ठेवत असल्याचे ते म्हणाले. यावर अधिकारी कौशिक पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपला विभाग हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, उच्च न्यायालयाने जलाशयांच्या कामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्तीच्या निर्माणाला मंजुरी देण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाडी भागातील तलावात हनुमानाची 108 फूटांची मूर्ती स्थापन करण्याबाबतचा हा वाद आहे. याबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशीही श्रीवास्तव यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. बडोदा नगर परिषदेने या प्रस्तावाला फेब्रुवारी 2019 मध्ये परवानगी दिली आहे. तसेच एक पादचारी पूल बांधण्यासही परवानगी देण्यात आली आहे. या घटनेनंतर गुजरातचे भाजप प्रवक्ते भरत पांड्या यांनी श्रीवास्तव यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. मात्र, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी घटनेवर प्रतिक्रिया देण्याऐवजी तलाव, सरोवरे आणि नद्यांच्या संरक्षणासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. मात्र, श्रीवास्तव यांच्या मूर्तीच्या कामाला मंजुरी देण्याचे प्रयत्न विभागाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामात कोणताही विलंब होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या