भाजप खासदाराने अधिकाऱ्याला चपलेने धू धू धुतले

सामना ऑनलाईन। मुरादाबाद

मुरादाबाद येथे भाजपच्या एका लोकसभा खासदाराने मद्यधुंद अवस्थेत अॅलिम्को कंपनीच्या जनरल मॅनेजर व त्याच्या सहकाऱ्याला लाथाबुक्कयांबरोबरच चपलेने धू धू धूतल्याचे समोर आले आहे. ठाकुर सर्वेश सिंह असे या खासदाराचे नाव आहे.

रातूपुरा येथे रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते दिव्यांगांना ट्रायसायकलचे वाटप करण्यात येणार होते. ट्रायसायकल पुरवण्याचे कंत्राट कानपूरस्थित आर्टिफिशयल लिम्बस मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(ALIMCO) या कंपनीला देण्यात आले होते. पण कंपनीने आवश्यक ती तयारी केली नसल्याने नाराज झालेल्या सिंह यांनी कंपनीचे जनरल मॅनेजर अशोक एसएन व त्यांचे सहकारी अरुण मिश्रा यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्कयांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच सिंह थांबले नाहीत तर त्यांनी अक्षरश: पायातील चप्पल काढून अशोक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या इतरांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या अशोक व त्याच्या सहकाऱ्याने तात्काळ ठाकुरव्दार पोलीस स्थानकात जाऊन सिंह यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहले असून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची वेळ मागितली आहे.