चवन्नीछाप लोकं काहीही लिहितात, खोटं बोलतील त्यांची जीभ झडेल; भाजप खासदाराचे विधान

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे उत्तर प्रदेशातील बागपत येथील भाजप खासदार सत्यपाल सिंह यांचे एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ‘सोशल मीडियावर चवन्नीछाप लोकं काहीही लिहितात’ असं त्यांनी म्हटलं आहे. सिंह पुढे म्हणाले की ‘अशी लोकं पुढील जन्मात माणूस बनणार नाही, पुढच्या जन्मात त्यांची जीभ झडेल आणि ते काहीही बोलू शकणार नाही’

उत्तर प्रदेश आणि हरयाणा या दोन राज्यांना जोडणारा एक पूल तयार करण्यात येत आहे. यमुना नदीवरील या पुलावरून विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी सिंह यांनी टीका केली होती. विरोधकांनी दावा केला होता की हा पूल त्यांनी बनविला आहे. यावरून सत्यपाल सिंह म्हणाले की ‘ चवन्नी छाप लोकं काहीही म्हणतात, ते म्हणतायत की आम्ही पूल बनविला आहे, आम्ही बनवतो आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे की हा पूल कोणी बनविला आहे. देवालाही हे माहिती असून दुनियेलाही माहिती आहे की पूल कोणी बनविला आहे.’ छपरौली इथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली आहे.

छपरौलीमधील टांडा गावात या पुलाचं काम सुरू आहे. हा पूल हरयाणातील पानिपतमधल्या खोजकीपूरमध्ये उतरतो. दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्हीकडच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बागपतहून पानिपतला जाण्यासाठीचं अंतर या पुलामुळे 30-35 किलोमीटरने कमी होणार आहे. सत्यपाल सिंह यांनी दावा केला आहे की हा पूल व्हावा यासाठी त्यांची भूमिका मोठी आहे. मात्र विरोधकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या