आणखी एका भाजप खासदाराचे मोदींविरोधात टीकास्त्र, आरक्षण बचाव यात्रा काढण्याचा निर्णय

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नाना पटोले यांच्यानंतर दिल्लीचे भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नोकरीतील आरक्षण धोक्यात आल्यामुळे २६ डिसेंबर रोजी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं उदित राज यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर यासंदर्भात माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी उत्तर देताना राज यांनी मोदी सरकारवर टीका केली.

डॉ. उदित राज म्हणाले की, सरकारी नोकऱ्या बंद केल्या जात आहेत. कामाचं आउट सोर्सिंग केल्यामुळे आरक्षणाला धोका उत्पन्न झाला आहे. सरकारी कार्यालयात भरतीच्या नियमांचं पालन होत नाही. त्यामुळे आम्ही २६ डिसेंबर रोजी परिसंघातर्फे आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत. आरक्षणाच्या बचावासाठी आम्ही रामलीला मैदानात आंदोलन करणार आहोत. हे सरकार जरी आमचं असलं तरीही चुकीच्या गोष्टींचा विरोध आम्ही नेहमीच करणार आहोत, असं राज यांचं म्हणणं आहे.

मोदी सरकारच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या वागणुकीवरही राज यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, कार्यालयीन बढतीवेळी मिळणाऱ्या आरक्षणाबाबतीत सर्वोच्च न्यायालयाची वागणूक चुकीची आहे. न्यायाधीश पक्षपाती असून त्यामुळेच निर्णयावेळी दलितांसोबत दुजाभाव केला जातो, अशी घणाघाती टीका राज यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या पद्धतीत बदल होणं गरजेचं आहे. दलित, ओबीसी, महिला या वर्गातून न्यायाधीशांची निवड झाल्यास मागासवर्गीयांना न्यायव्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळेल. प्रतिनिधित्व मिळालं तरच मागासवर्गीयांना न्याय मिळेल, असंही राज यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या