Video – भाजप खासदाराने मोडला संचारबंदीचा नियम, रात्री सलून उघडून केली कटिंग

1241

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. पण, भाजपच्या खासदाराने सर्वच नियम पायदळी तुडवल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. फक्त कटिंग करण्यासाठी खासदार महोदयांनी रात्री एकट्यासाठी दुकान उघडे ठेवले होते. एवढेच नाही तर त्यांनी सलूनमध्ये मास्क देखील लावलेला नव्हता.

लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार वारंवार लोकांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यासाठी सूचना देत आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठांना ठराविक दिवस आणि वेळ ठरवून दिली आहे. याच वेळेत दुकानं उघडी ठेवणे बंधनकारक आहे.पण, भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार आणि नगराध्यक्ष सुनील मेंढे हे यासाठी अपवाद ठरले आहे. सुनील मेंढे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. फक्त केस कापण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास लॉकडाउनचा नियम धाब्यावर बसून सलूनचे दुकान उघडे ठेवायला लावले. त्यानंतर त्यांनी या दुकानात केस कापून घेतले. केस कापताना त्यांनी मास्क देखील लावलेला नव्हता. या घटनेचा काही स्थानिक लोकांनी व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. या व्हिडीओत काही नागरिक खासदार सुनील मेंढे यांच्या सुरक्षा रक्षकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत.’ रात्री अकरानंतर कुठल्या कायद्यात दुकान सुरू आहे’ असं विचारतात गार्डने मला विचारू नका साहेबांना विचारा असं सांगत तोंड वळविले.कुणीतरी आपला व्हिडिओ काढत आहे असं सुनील मेंढे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हिडिओ काढणे बंद आहे, असं लक्षात येताच झपाट्याने दुकानाबाहेर /sl गाडीत बसून तिथून ते निघून गेले. या सर्व प्रकाराने चिडलेल्या संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत खासदार सुनील मेंढे आणि दुकानदार याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नगराध्यक्ष हा शहराचा प्रमुख व्यक्ती असतो जर प्रमुख व्यक्ती अशा पद्धतीने मुद्दाम केंद्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली जावी तसेच नैतिकतेच्या आधारावर या नगराध्यक्ष आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या