भाजप हा थापाड्यांचा व महाराष्ट्राला बदनाम करणारा पक्ष! – महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

भाजप फक्त 100 टक्के राजकारण करणारा पक्ष आहे त्यावर विश्वास ठेवू नका. थापाड्यांचा व महाराष्ट्राला बदनाम करणारा हा पक्ष आता पुढील 25 वर्षे हा पक्ष सत्तेवर येत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करतो. मात्र, भाजप हा केवळ सत्तेचा भुकेला असल्याची टीका, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री
अब्दुल सत्तार यांनी केली.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पदवीधरांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर हे होते. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेना जिल्हा युवाधिकारी भाऊसाहेब घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप हा जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम कत असून बहुजनांकडे सत्ता जायला नको या मानसिकतेने 100 टक्के राजकारण करत आहे. हे राजकारण करत असताना खोटे बोल पण रेटून बोल असे त्यांचे राजकारण
असते. ते आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांना ‘सत्ता मिळणार सत्ता मिळणार’ असे गाजर कार्यकर्त्याना दाखवावे लागत आहे. वास्तविक पाहता आता त्यांना सत्ता मिळणारच नसल्याचे त्यांनी म्हटले.

दोन महिनेचे काय दोन दशकेही तुमची सत्ता येत नाही, खोतकरांचा टोला

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी पदवीधर मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला. दोन महिनेच काय कधीच आता तुमची सत्ता येत नाही. आहे तेच लोक सांभाळण्यासाठी सत्ता येणार असे म्हणावे लागत असल्याचे त्यांनी दानवे यांचे नाव न घेता त्यांच्या दोन महिन्यात सत्ता येणार या वक्तव्याचा समाचार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या