राहुल गांधींचे ‘ते’ फोटो भाजपने केले रिट्वीट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या विदेशात असून बुधवारी ते जर्मनीला पोहोचले. या ठिकाणी हॅम्बर्ग येथील बूसेरियस समर स्कूलला त्यांनी भेट देत संवाद साधला. या दरम्यान त्यांनी मोदी सरकारवर नोटबंदी आणि जीएसटीवरून तिखट शब्दात हल्लाबोल केला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून जर्मनीमध्ये काढण्यात आलेले राहुल गांधीचे फोटो ट्वीट केले. परंतु हे ट्वीट करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.

काय आहे नक्की फोटोत?
काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचे विविध मुद्रांमधील काही फोटो ट्वीट केले आहेत. याखाली त्यांनी, राहुल गांधी यांचे वेगवेगळे चेहरे (राहुल गांधी के अलग अलग चेहरे) असे कॅप्शनही दिले आहे. परंतु हे फोटो ट्वीट करताच राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीवर ट्रोलर्स तुटून पडले. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी (भाजप)ने देखील हे फोटो रिट्विट केले आहेत. रिट्विट करताना भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ‘आम्ही देखील हे फोटो रिट्विट करण्यावाचून रोखू शकलो नाही.’

ट्रोलर्सने साधला निशाणा
राहुल गांधी यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांचा जुना फोटो एकत्र करून ट्रोल केले, तर काहींनी राहुल गांधी 2019 निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी पक्ष शोधत असल्याचे म्हटले आहे.