भाजपला घरची ‘किक’, फुटबॉलपेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष द्या

43

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी फुटबॉल खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे अधिक लक्ष द्यावे’, असे भाजप खासदार नाना पटोले यांनी म्हटले आहे. खासदार पटोले यांनी फुटबॉलची ‘किक’ आपल्या शैलीत लगावत सरकारला घरचा आहेर दिला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोतलाना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल उघड भूमिका घेतली. याआधीही पटोले यांनी अनेक वेळा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे.

१७ वर्षांखालील मुलांची जागतिक फुटबॉल स्पर्धा हिंदुस्थानात होणार आहे. यानिमित्ताने राज्यात प्रत्येक शाळेत फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत मुख्यमंत्र्यांसोबत सरकारचे अनेक मंत्रीही सहभागी झाले होते. यावर निशाना साधताना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सरकारने वाढविली आहे. ही मुदत वाढविण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे आवश्‍यक आहे. कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या नावावर पैशांची वसुली केली जात आहे. शेतकऱ्यांना सेतू केंद्रातून कागदपत्रे घेण्यासाठी जीएसटी भरावा लागत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शेतकऱ्यांकडून हा जीएसटी वसूल करणे तात्काळ बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.

खासदार पटोले यांनी वाढत्या पेट्रोल दरावरही टीका केली. नागपुरात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या