अब की बार युतीचे 220 पार, भाजपचा कार्यकारिणीत नारा

69

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळाला असला तरी लोक आपल्यालाच निवडून देणार या मानसिकतेत राहू नका. लोकांना गृहीत धरले तर आपले पतन सुरू होईल. प्रत्येक लढाई सारखी नसते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी आहे. रणांगण बदलले आहे, आता रणनीती बदलावी लागेल. ‘अब की बार 220 पार’ हा आपला नारा असून युतीची प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित विशेष कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काही जागा केवळ अवघ्या काही मतांच्या फरकाने पडल्या. विधानसभा निवडणुकीत ज्या जागा मिळतील त्या आपल्याला लढवायच्या आहेत. पक्षाकडून कुणाला तिकीट द्यायचे हे ठरवले जाईल, मात्र कुणीही परस्पर तिकीटवाटप सुरू करू नका. तिकिटासाठी मुंबईच्या वाऱया करू नका. जर कुणी तिकिटासाठी मुंबईत आले तर त्याचा एक मार्क तिथेच गेला हे समजून जा.

1 ते 31 ऑगस्ट मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. 1 ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार आहेत.

काँग्रेसचा बरमुडा झाला आहे : दानवे

रावसाहेब दानवे यांनी ‘‘भाजप हा एक परिवार आहे. मात्र काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना नवीन अध्यक्ष मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसचा तुकडे कापून कापून बरमुडा झाला आहे’’ अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला.

भाजप पब्लिक लिमिटेड कंपनी

आपल्याकडे अनेक नवीन लोक येतात. भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही तर पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. त्यामुळे इतर पक्षांतील चांगल्या लोकांना वाटत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावे तर आपल्याला त्यांना घ्यावे लागेल. इथे जो येतो तो भाजपचा होतो. कारण इथे येण्याचा मार्ग आहे, जाण्याचा नाही. तेव्हा कुणी आले म्हणून फार काही त्रागा करण्याची आवश्यकता नाही, अशीही समज मुख्यमंत्र्यांनी या कार्यकारिणी सभेत दिली.

288 जागांची तयारी करा : पाटील

‘‘भाजप आणि शिवसेना हे एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. दोघेही एकाच घरातील भावंडे आहेत. त्यामुळे काही मतभेद असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांनी सर्व 288 जागांची तयारी करावी. कारण आपल्या वाटय़ाला येणाऱ्या जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकल्या तरी आपल्याला मित्रपक्षांची गरज पडेल. त्यामुळे मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणावे लागतील. त्यासाठी सर्व जागांवर चोख तयारी असणे आवश्यक आहे’’ असे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. आगामी निवडणुकीत महायुतीने किमान 220 जागा जिंकल्याच पाहिजेत हा आपला निर्धार आहे, असेही पाटील म्हणाले.

युतीतच निवडणूक लढवायचीय; संभ्रम ठेवू नका!

कुठल्या जागा कुणाला मिळणार, कुठल्या ठिकाणी लढायचे याबाबत संभ्रम ठेवू नका. आपल्याला युतीतच निवडणूक लढवायची आहे. मुख्यमंत्री म्हणून जे काही वादविवाद उभे करतात त्या वादात आपण पडायचे कारण नाही. कोण मुख्यमंत्री होणार हे जनता ठरवील. कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी घेणार आहे असे सांगतानाच मी एकटय़ा भाजपचा मुख्यमंत्री नाही तर शिवसेना आणि रिपाइंचाही मुख्यमंत्री आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी विनम्र अभिवादन केले. सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

आपली प्रतिक्रिया द्या