मणिपुरातही भाजपची जुळवाजुळव

बिरेन सिंग, मुख्यमंत्री पदाचे भाजप उमेदवार

सामना ऑनलाईन,इंफाल

गोव्याप्रमाणे भाजपने मणिपुरातही अपक्ष आणि इतर पक्षांतील आमदारांना सोबत घेऊन बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव केली आहे. एन. बिरेनसिंह यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली असून लवकरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक २८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांनी केली आहे. काँग्रेसही सरकार स्थापनेस तयार आहे. आमच्याकडेही बहुमताचा आकडा आहे असा दावा त्यांनी केला. या राजकीय घडामोडींमुळे मणिपुरात राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे.

६० आमदारांच्या मणिपूर विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, मात्र काँग्रेसने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या तर भाजपला २१ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा मॅजिक ३१ चा आकडा कुणालाही न मिळाल्यामुळे मणिपूरमध्ये त्रिशंकू स्थिती झाली आहे. काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी अवघ्या ४ आमदारांची गरज होती, मात्र भाजपने लवकर जुळवाजुळव करीत ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्याकडे सादर केले. भाजपला प्रत्येकी ४ जागा जिंकणाऱया नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टीने पाठिंबा दिला. तसेच लोकजनशक्ती, तृणमूल काँग्रेस आणि एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा असल्याचा दावा करीत संख्याबळ ३२ वर पोहचल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

काँग्रेसचाही बहुमताचा दावा
मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी नॅशनल पीपल्स पार्टीच्या ४ आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा असलेले साध्या कागदावरील पत्र राज्यपालांना दाखविले. मात्र त्या आमदारांना आणि पक्षाच्या अध्यक्षांना हजर करावे लागेल असे राज्यपालांनी म्हटले आहे.

इबोबी सिंह यांचा अखेर राजीनामा
नियमाप्रमाणे मावळते मुख्यमंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत नवीन सरकारची प्रक्रिया सुरू होणार नाही असे हेपतुल्ला यांनी सांगितल्याची माहिती राजभवनाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी आज किंवा उद्या आपण राजीनामा देऊ असे म्हणणारे इबोबी सिंह यांनी रात्रीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या