भाजपच्या प्रचाराला कोरोनाची नजर, शाहनवाज हुसैन, राजीव प्रताप रुडी, सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण

shahnawaz-hussain

बिहारमध्ये भाजपच्या प्रचाराला कोरोनाची नजर लागली आहे. भाजपचे स्टार प्रचारक शाहनवाज हुसैन, राजीव प्रताप रुडी यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोदी यांना पाटण्याच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करून ही माहिती दिली.

बिहार विधानसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. बिहार ताब्यात घेण्यासाठी खुद्द कंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारपासून झंझावाती प्रचार करणार आहेत. राज्यात त्यांच्या 12 जंगी सभा होणार आहेत. मात्र त्याअगोदरच भाजपचे स्टार प्रचारक राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाज हुसैन यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी स्वतःच आपण कोरोनाबाधित असल्याचे ट्विट करून सांगितले. सामान्य लक्षणे असली तरीही आपण खबरदारी म्हणून एम्समध्ये भरती झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हलका ताप असल्यामुळे थकवा जाणवत असल्याचे सुशील मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनावर मात करून लवकरच प्रचाराला येईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबरोबर जंगी जाहीर सभा घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या