राहुल गांधींच्या ‘जॅकेट’वरून भाजपने पेटवला वाद

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होत असलेल्या मेघालयात राहुल गांधी हे सोमवारी संध्याकाळी ‘काळे जॅकेट’ घालून एका म्युझिक कन्सर्टला उपस्थित होते. त्यांचे ते जॅकेट ७० हजार रुपयांचे आहे, असे नमूद करत मेघालय भाजपने आज त्यावरून वाद पेटवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ सालात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सोबतच्या बैठकीवेळी १० लाखांचा सूट परिधान केला होता असे सांगत राहुल गांधी यांनी त्यावेळी मोदींवर हल्ला चढवला होता. इतकेच नव्हे तर नंतर त्यांनी नेहमीच मोदी सरकारची ‘सूट बूट की सरकार’ अशीच संभावना केली. त्याचा ‘बदला’ घेण्यासाठी भाजपने राहुल गांधींवर शरसंधान केले. त्यासाठी त्यांच्या ‘जॅकेट’ची संधी साधली.

‘ट्विटर’ चकमक
राहुल गांधी हे मेघालयातील काँग्रेसचे भ्रष्ट सरकार राज्याची तिजोरी लुटत असताना काळय़ा पैशाचे प्रतीक असलेले काळे जॅकेट घालून फिरत आहेत. त्यांचे इथले सरकार काळय़ा पैशातील सूट बूट की सरकार आहे. –  मेघालय भाजप

मोदींच्या सूटची करून दिली आठवण
भाजपने हा हल्ला चढवताच काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १० लाखांच्या सुटातील छायाचित्र ट्विटरवर अपलोड केले. तो सूट मोदींनी नंतर ४ कोटी ३१ लाख रुपयांत लिलावात विकला याची आठवणही त्यांनी करून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या