प्रणव मुखर्जींच्या भाषणावर लालकृष्ण आडवाणी यांची प्रतिक्रिया

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून केलेल्या भाषणावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण करणे ही इतिहासातली महत्त्वाची घटना आहे. अशा प्रकारे खुल्या पद्धतीने विचारांची देवाण घेवाण केल्याने ऐकमेकांबाबतचा सन्मान वाढेल, असं आडवाणी म्हणाले.
प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आडवाणी यांनी त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. प्रणव मुखर्जी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहेत. प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत यांच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी त्यांच्यात झालेला संवाद कौतुकास्पद आहे. दोघांनी हिंदुस्थानच्या विविधतेतील एकता आणि त्यातूनच राष्ट्रवाद कसा वाढवला पाहिजे हे दोघांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या विचारसरणीतून देशापुढे आदर्श विचार ठेवले असेही अडवाणी यांनी म्हटले आहे. लालकृष्ण अडवाणी पुढे म्हणाले की, प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर झालेला वाद आणि मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संस्कृतीबाबत भूमिका मांडली.
आपली प्रतिक्रिया द्या