… तर भाजपची स्वबळावर लढायची तयारी – मुनगंटीवार

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. शिवसेनेच्या या निर्णयाबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भाजपचा एक नेता आणि कार्यकर्ता म्हणून शिवसेना-भाजप युती होईल अशी अपेक्षा आहे. युती होणार नाही असे भाजपने म्हटले नाही. युती करायची नाही अशी शिवसेनेची ठाम भूमिका असेल तर राजकीय पक्ष म्हणून भाजप जबरदस्तीने युती करणार नाही. युती ही भाजपची मजबुरी नाही. युती ही तर्कावर आणि आकड्यांवर होत असते, युती कधीही भावनेवर होत नसते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

तसेच युती झाली नाही तर भाजप निवडणूक लढणार नाही असे नाही. शिवसेनेला युती करायची नसेल तर भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. २८८ जागा लढवू आणि सत्ताही मिळवू. परंतु राज्याच्या जनतेला शिवसेना-भाजप युती व्हावी असे वाटते. राज्यात काँग्रेसचे सरकार ४७ वर्ष, २ महिने १ दिवस होते, परंतु सामान्य प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत. त्यासाठी शिवसेना-भाजपच्या युतीची सत्ता हवी. परंतु शिवसेनेला युती नको असेल तर भाजप जबरदस्ती करणार नाही.

भेट नाकारण्याचा प्रश्नच नाही
प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट नाकरल्याचे वृत्त आले. या वृत्तावर बोलताना ते म्हणाले की, भेट नाकारण्याचा विषय उपस्थित होत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज कोणतीही भेट ठरली नव्हती. कधीतरी भेटूया असा निरोप पाठवला होता. त्यामुळे भेट नाकारण्याचा विषय नाही. तसेच येणाऱ्या दिवसात नक्कीच भेट होईल. ही दोन देशांची चर्चा नाही तर मित्रपक्षाशी चर्चा आहे, त्यामुळे वेळेनुसार ही भेट होईल.