उत्तर प्रदेशात ‘योगी’योग; मायावतींच्या आशा पल्लवित

24

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने चांगले यश मिळविले असून १६ पैकी १४ महापालिकांत महापौरपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मायावती यांच्या बसपानेही कमबॅक करताना दोन महापालिकांत महापौरपद मिळविले. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा मात्र मोठा पराभव झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील १६ महापालिका, १९८ नगरपालिका आणि ४३८ नगर पंचायतींसाठी २२, २६ आणि २९ नोव्हेंबरला तीन टप्प्यांत मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी या निवडणुका महत्त्वपूर्ण होत्या. भाजपसाठी हा ‘योगी’ योग चांगला ठरला आहे. उत्तर प्रदेशात महापौर आणि नगराध्यक्षांची निवड जनतेतून केली जाते. २०१२ च्या निवडणुकीत १४ महापालिका होत्या. यावेळी अयोध्या-फैजाबाद आणि मथुरा-वृंदावन या दोन नव्या महापालिका निर्माण झाल्या. गेल्या वेळी भाजपचे १० महापालिकांत महापौर होते. यावेळी १६ पैकी १४ महापालिकांत भाजपचे महापौर विजयी झाले आहेत. १६ महापालिकांतील ६५२ नगरसेवकांपैकी भाजपचे ३४१ आहेत, बसप ११६ सप ८१, काँग्रेस १९ आणि अपक्ष व इतर ९५ नगरसेवक आहेत.

विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचा धुव्वा उडाला होता; मात्र पंचायत निवडणुकांत बसपा दुसऱया क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. २०१२च्या निवडणुकीत बसपाचा एकही महापौर नव्हता. या निवडणुकीत अलीगढ आणि मेरठ महापालिका बसपाच्या ताब्यात आल्या आहेत. शहरी भागात बसपचे दोन महापौर झाले असताना महापालिका निवडणुकीत अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला. एकही महापालिका सपा, काँग्रेसच्या ताब्यात आली नाही.

शिवसेनेने खाते उघडले
उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर एका नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने खाते उघडले आहे. अलाहाबादमध्ये वॉर्ड क्र. ४० मधून दीपेश यादव, उन्नावमध्ये वॉर्ड क्र. १६ मधून अशोक तिवारी, कासगंज येथे वॉर्ड क्र. ६ मधून नेत्रपाल सिंह या शिवसेनेच्या शिलेदारांनी विजयाचा भगवा फडकवला आहे. तर सीतापूर येथील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या संगीता जोशी यांनी विजयावर मोहोर उमटवली आहे.

अमेठीत काँग्रेसचा दारुण पराभव
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. अमेठी मतदारसंघातील गौरीगंज आणि जैश नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यातून गेल्या. गौरीगंजमध्ये सपाचा नगराध्यक्ष तर जैशमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला. अमेठी आणि मुसाफिरखाना नगर पंचायतीत काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला नव्हता. अमेठीत भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

गोरखनाथ मठ वॉर्डात भाजपचा पराभव
राज्यात भाजपला चांगले यश मिळत असताना खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखनाथ मठ असलेल्या वॉर्ड क्रमांक ६८ मध्ये मात्र भाजप उमेदवार माया त्रिपाठी यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार नदिरा खातून या विजयी झाल्या. गोरखपूर महापालिका भाजपच्या ताब्यात आली आहे.

– भाजपचे महापौर – लखनौ, अलाहाबाद, कानपूर, गोरखपूर, वाराणसी, आग्रा, फिरोजाबाद, गाजियाबाद, सहारनपूर, मथुरा, अयोध्या, मुरादाबाद, झांसी, बरेली.
– बसपाचे महापौर – अलीगढ, मेरठ.
– लखनौ महापालिकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला महापौर झाल्या आहेत. भाजपच्या संयुक्ता भाटिया विजयी झाल्या.
– अलीगढमध्ये भाजपला धक्का बसला. १९९५ पासून येथे भाजपचा महापौर होता; मात्र यावेळी बसपाचे मोहम्मद फुरकान विजयी झाले.
– अयोध्येत पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक झाली. भाजपचे हृषीकेश उपाध्याय हे ३६०१ मतांनी विजयी झाले. समाजवादी पार्टीने तृतीयपंथी गुलशन बिंदू यांना उमेदवारी दिली होती. बिंदू यांनी कडवी लढत दिली.

आपली प्रतिक्रिया द्या