उपऱ्यांची भाजपमध्ये दादागिरी, वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली

bjp-women

नालासोपाऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये एका महिला पदाधिकाऱ्याने दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली. हा सगळा प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर घडला असून सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या महिला पदाधिकाऱ्याने ही मारहाण केली आहे त्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव प्रज्ञा पाटील असे असून त्या 3 वर्षांपूर्वी मनसेतून भाजपमध्ये आल्या आहेत. इतर पक्षातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्याने भाजपच्या निष्ठावंत महिला पदाधिकाऱ्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नालोसापारा येथे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, जिल्हाध्यक्ष राजन नाईक तसेच अनेक नेते मंडळी,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांनी महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव आम्रपाली साळवे यांच्या कानाखाली मारली. त्यांनी असं का केलं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.

आम्रपाली साळवे यांनी या प्रकाराबाबत बोलताना म्हटले आहे की, मी बेसावध असताना प्रज्ञा पाटील यांनी अचानक मला येऊन मारहाण केली. त्यांच्याशी माझा कसलाच वाद नव्हता. वरिष्ठांसमोर असा प्रकार घडला हे खेदजनक आहे. याप्रकरणी महिला प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली असून, ते न्याय देतील, अशी मला आशा आहे. तर प्रज्ञा पाटील यांनी घडल्या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की, ‘सध्या मी यावर भाष्य करणार नाही. परंतु जे घडले त्याला कारण आहे. माझ्याबाबतीत यापूर्वी अत्यंत वाईट प्रकार झालेला आहे. वरिष्ठांपुढे मी या संदर्भात माझी बाजू मांडणार आहे’.