…तर २०१९मध्ये भाजपाचा पराभव निश्चित आहे!

60

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ‘मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्यानेच भाजपचा विजय झाला’, असा आरोप मायावती यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात ‘योगी’योग; मायावतींच्या आशा पल्लवित

‘भाजपमध्ये हिंमत असेल तर २०१९मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेऊन दाखवावे, असे आव्हान मायवती यांनी दिले आहे. तसेच बॅलेट पेपरने मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘यूपी’च्या पालिका निवडणुकीत मतदार याद्या आणि ईव्हीएममध्ये गडबड!

उत्तर प्रदेशमधील १६ महापालिका, १९८ नगरपालिका आणि ४३८ नगर पंचायतींसाठी २२, २६ आणि २९ नोव्हेंबरला तीन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांमध्ये १६ पैकी १४ महापालिकांत भाजपचे महापौर विजयी झाले आहेत. भाजप पहिल्या तर बसप दुसऱ्या स्थानावर आहे. १६ महापालिकांतील ६५२ नगरसेवकांपैकी भाजपचे ३४१, बसप ११६, सप ८१, काँग्रेस १९ आणि अपक्ष व इतर ९५ नगरसेवक आहेत. निकालानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याला आरोप लावला.

‘भाजप खरंच प्रामाणिक आणि लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष असेल तर ईव्हीएम मशीन हटवून त्याऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे. बॅलेट पेररद्वारे मतदान झाल्यास २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव करू,’ असा विश्वासही मायावती यांनी व्यक्त केला आहे. याआधी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने पाशवी संख्याबळ मिळवले होते. त्यानंतरही मायावती यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचाआरोप केला होता.

दरम्यान, काल निकाल जाहीर झालेल्या उत्तर प्रदेशातील पालिका निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ आणि ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची कबुली राज्याचे निवडणूक आयुक्त एस. के. अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. तसेच जाणूनबुजून मतदारांची नावे गाळण्याचे प्रकार हे गुन्हेगारी कृत्य आहे असे सांगतानाच चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या