ठाण्यात शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, राष्ट्रवादीचा आरोप

ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असून यासाठी एकनाथ शिंदेंवर भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांचा ओवळा माजीवाडा मतदारसंघ आहे मात्र हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. तसेच इतर दोन मतदारसंघ देखील भाजपला हवे असून त्यादृष्टीने भाजप रणनीती आखत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

शिवसेनेशी गद्दारी करुन भाजपसोबत संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे व त्यांच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर भाजपची वक्रदृष्टी पडल्याने ही धुसफूस वाढत जाणार आहे. त्यामुळे शिवसेना सोडून चूक केली असा पश्चाताप त्या आमदारांना करावा लागेल, असा दावा महेश तपासे यांनी केला.

नुकतेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या तिन्ही मतदारसंघात भाजपचे मेळावे घेतले होते. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे अशा बातम्या आल्या होत्या. आता ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ हे तिन्ही मतदारसंघ भाजपला हवे असून त्यात प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघाची डील झाल्याने एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांच्यात धुसफूस वाढल्याच्या बातम्या दाखवल्या जात असल्याचे तपासे म्हणाले.