भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे राज्यसभेत रंगत

14

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपकडून तीन उमेदवारांची नावे घोषित झाली असताना आज ऐनवेळी विजया रहाटकर यांनीही भाजपकडून राज्यसभेसाठी अर्ज भरल्याने या निवडणुकीत रंगत वाढली आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठीच्या या निवडणुकीत ७ उमेदवार रिंगणात उतरल्याने आता निवडणूक बिनविरोध होणार की २३ मार्च रोजी खुले मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयीचे चित्र गुरुवारी १५ मार्च रोजी स्पष्ट होणार असले तरी यामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. या सहाही जागांसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. तसेच प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान ४२ मतांची आवश्यकता लागणार आहे. मतांचा कोटा पाहता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे.

शिवसेनेच्या वतीने माजी खासदार अनिल देसाई यांना तर काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसने वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेचे नारायण राणे व केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांच्याबरोबरच महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही रिंगणात उतरवून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. राणे, मुरलीधरन, रहाटकर तसेच केतकर यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज भरले.

काँग्रेस व राष्ट्रवादीची मदार अपक्षांवर
भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. काँग्रेसकडे ४२ उमेदवार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले तर नीतेश राणे, कालिदास कोळंबकर हे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस पक्षात असले तरी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील याचा काँग्रेसला भरवसा नाही. त्यामुळे काँग्रेसकडे फक्त ३९ मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे उमेदवार कुमार केतकर यांना विजयासाठी तीन मते कमी पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत ४१ सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि बंडखोर आमदार रमेश कदम हे दोघेही तुरुंगात आहेत. यापैकी भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने ते राज्यसभेसाठी मतदान करतील की नाही याबाबत साशंकता आहे, तर रमेश कदम हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सारी भिस्त ही अपक्ष व छोट्या पक्षांच्या आमदारांवर राहणार आहे.

विधानसभेतील संख्याबळ
भाजप : १२२, शिवसेना : ६३, काँग्रेस : ४१, राष्ट्रवादी काँग्रेस : ४१, शेकाप :०३, बहुजन विकास आघाडी : ०३, एमआयएम : ०२, मनसे : ०१, माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष : ०१, भारिप बहुजन महासंघ : ०१, राष्ट्रीय समाज पक्ष : ०१, समाजवादी पक्ष : ०१, अपक्ष : ०७

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार
भाजप : प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, विजया रहाटकर
शिवसेना : अनिल देसाई
काँग्रेस : कुमार केतकर
राष्ट्रवादी काँग्रेस : वंदना चव्हाण

आपली प्रतिक्रिया द्या