एका मुखवट्यानं आयफोनला फसवलं!

29

सामना ऑनलाईन । मुंबई

तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अॅपलने नुकताच आयफोन एक्स लॉन्च केला आहे. या फोनची विक्री सुरू झाली असून त्याला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे हा स्मार्टफोन ‘आउट ऑफ स्टॉक’ झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत. मात्र त्यामध्ये दिलेला Face ID सर्वात जास्त लोकप्रिय झाला आहे. कंपनीने लॉन्च दरम्यान दावा केला होता की हा Face ID कोणताही मास्क किंवा जुळा भाऊ सुद्धा उघडू शकत नाही.

बकाव नावाच्या एका व्हिएतनाम सिक्युरिटी कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या फर्मचे संशोधक एका 3D मास्कद्वारे आयफोन एक्सचा Face ID अनलॉक करताना दिसत आहे. त्यामुळेच एखाद्याच्या चेहराचा एक 3D डुप्लीकेट तयार करून Face ID अनलॉक करता येत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी अगदी सहजपणे आयफोन एक्स अनलॉक केला. 3D मास्क तयार करण्यासाठी प्लास्टिक, सिलिकॉन, मेक-अप आणि काही सामान्य पेपर कट आउटचा त्यांनी वापर केला आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार असा 3D प्रिंटेट कम्पोजिट मास्क तयार करण्यासाठी १५० डॉलर खर्च आला. या सिक्योरिटी फर्मने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अॅपलने हे योग्यरित्या केले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच Face IDला मास्कचा वापर करून फसवता येतं. त्यामुळे हे एक प्रभावी सिक्योरिटी मेजर्स नसल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. आयफोन एक्समध्ये दिलेल्या Face ID ला अनलॉक करण्यासाठी इतर सिक्युरिटी कंपन्यांनी देखील अनेक प्रकारचे मास्क तयार केले मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही.

आम्ही अॅपलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालविण्यास यशस्वी झालो आहोत आणि आम्हाला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं कार्य करते. तसेच सिक्योरिटी मेजर्ससाठी फेस रिकॉग्निशन प्रभावी नसल्याचं आम्हीच पहिला सांगितल्याचं ही कंपनीने म्हटलं आहे. या क्षणी अॅपलने या विकासावर काहीही सांगितले नाही. कदाचित भविष्यात याबाबत कंपनी एक निवेदन जारी करू शकते कारण ही एक मोठी समस्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या