बीकेसीतील कोरोना हेल्थ सेंटर मजबूतच! सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओची पालिकेकडून पोलखोल

2989

निसर्ग वादळामुळे बीकेसीतील कोरोना हेल्थ सेंटरला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे सांगतानाच पालिकेने सोशल मीडियावर फिरत असलेले व्हिडीओ आणि छायाचित्रे बोगस असल्याचे स्पष्ट केले आहे. बीकेसीतील सुस्थितीत आणि मजबूतरीत्या उभ्या असलेल्या कोरोना हेल्थ सेंटरचे फोटोही पालिकेने ट्विटरवर अपलोड केले आहेत. यामुळे पालिकेला जाणीवपूर्वक बदनाम करणार्‍यांना सडेतोड उत्तर मिळाले आहे.

वांद्रे कुर्ला संकुलमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून एक हजार खाटांचे कोरोना हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी आता पालिकेच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास सुरुवातही करण्यात आली आहे. असे असताना मंगळवारच्या निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर काही जणांनी बीकेसीतील कोरोना हेल्थ सेंटरचे फोटो दुरवस्था झालेले फोटो सोशल मीडियात व्हायरल केले होते. मात्र या फोटो, व्हिडिओत काहीच तथ्य नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुरक्षेसाठीच रुग्णांना हलवले
निसर्ग वादळात प्रतितास 120 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. यामुळेच बीकेसीतील रुग्णांना वरळी येथे हलवण्यात आले होते. सुदैवाने वादळाचा मोठा फटका मुंबईला बसला नाही. आरोग्य केंद्राच्या कुंपणाचे किरकोळ नुकसान झाले. मात्र तरीदेखील बीकेसीतील आरोग्य केंद्राबाबत चुकीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान, या ठिकाणाहून हलवलेल्या रुग्णांना पुन्हा आणण्याची कार्यवाहीही पालिकेने सुरू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या