…आणि अचानक आकाशातून पडायला लागली काळी राख! सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आकाशातून काहीतरी वस्तू येऊन पडणे आणि मग त्याच्यावर लांबलचक चर्चा सुरू होणे ही तशी काही विशेष बाब राहिलेली नाही. सध्या आकाशातून पडलेल्या काळ्या राखेची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे.

काय झालं नेमकं

बिहारची राजधानी पाटणाजवळ शनिवारी संध्याकाळी आकाशातून काळसर रंगाचे धागे पडत असल्याचं दिसलं. हे धागे हातात घेतल्यानंतर ती राख असल्याचं लोकांच्या निदर्शनाला आलं.

झालं! नेटकऱ्यांनी यावरही एका चर्चासत्राला सुरुवात केली. काहींना हे पक्ष्यांचे अवशेष वाटले तर काहींना शेत भाजल्यामुळे उडलेली राळ वाटली. या राखेच्या तंतूंचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेत भर पडत गेली. कुणालाही कळत नव्हतं की हे नक्की आहे काय?

काय सांगतात तज्ज्ञ

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही एकप्रकारची राखच आहे. पण ती आकाशातून पडलेली नाही. दरवर्षी याच दरम्यान नदी किनारी एक विशिष्ट गवत उगवतं. त्याला स्थानिक भाषेत सरकंडा म्हणतात.

पाटण्यानजीक वाहणाऱ्या सोन नदीच्या तीरावरही हे गवत उगवतं. नदीच्या काठावर असलेल्या शेतांमध्ये या गवताचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं.

मग शेतकरी आपली जमीन साफ करण्यासाठी हे गवत कापतात. या मोसमात हवेचा रोखही खूप जास्त असतो. त्यामुळे या गवताची राळ उडून दुसरीकडे जाते आणि हळूहळू पुन्हा जमिनीवर येते.

डोळ्यांसाठी घातक

ही राख डोळ्यांसाठी अत्यंत घातक आहेत. राखेचे कण डोळ्यात गेल्यास भयंकर जळजळ होते. काहींना या राखेची अॅलर्जीही होऊ शकते. डोळ्यांतून पाणी येणं आणि खाजही सुटते. त्यामुळे जर या राखेचे कण डोळ्यात गेले, तर डोळे न चोळता पाण्याने ते धुवावेत असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या