मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे फलक

15

पालिकेतून 27 गावे वगळा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका कार्यक्षेत्रातील 27 गावे वगळून त्या गावांची स्वतंत्र नगरपालिका करू, असे जाहीर गाजर दाखवले होते. मात्र दीड वर्ष उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन पाळले नाही. याचा निषेध म्हणून आज 27 गावांतील नागरिकांनी काटई नाक्यावर मुख्यमंत्र्यांना काळे फलक दाखवले. डोंबिवली येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येताना मुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले.

दीड वर्षापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली. सत्ताधारी शिवसेनेकडून सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपाने जंग जंग पछाडले. मात्र येथील मतदारांनी भाजपला पूर्णपणे झिडकारत शिवसेनेचा भगवा पालिकेवर कायम ठेवला. याच निवडणुकीत प्रचार सभांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका कार्यक्षेत्रातील 27 गावे वगळून त्या गावांची स्वतंत्र नगरपालिका करू, असे जाहीर आश्वासन दिले होते. मुळात कुणाचीही मागणी नसताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर केवळ भाजपला फायदा व्हावा यासाठी कल्याण, डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील 27 गावे घाईघाईने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केली. मात्र हे बूमरँग भाजपवरच उलटले. या 27 गावांतील नागरिकांचा प्रचंड रोष पाहून पुन्हा ही गावे कल्याण-डोंबिवली माहानगरपालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन प्रचार सभांमधून मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाला दीड वर्ष उलटून गेले तरी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन पाळले नसल्याने याचा निषेध म्हणून डोंबिवली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येणाऱया मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा 27 गावांतील नागरिकांनी दिला होता. राष्ट्रवादीचे सुधीर वंडार-पाटील मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सौजन्यही मुख्यमंत्र्यांनी दाखवले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या