विशाल कृष्णविवर

khagoldilip@gmail.com

कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल ही विश्वातली अशी जागा की, तिथे जाणारा प्रकाशही परत येत नाही. साहजिकच तिथे काहीच दिसत नाही. त्याच्या काठावर (इव्हेन्ट होरायझन) लोपलेल्या प्रकाशानंतर सारा अंधार. असे काही ‘आकार’ जेव्हा अवकाश अभ्यासकांना आढळून आले तेव्हा त्यांनी त्याला कृष्णविवर हे नाव दिलं.

आपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) मध्यभागीसुद्धा प्रचंड वस्तुमानाचं कृष्णविवर आहे. त्याच्याभोवती सारी दीर्घिका फिरते. त्यातील आपल्या सूर्यमालेसारख्या गोष्टीही वेगाने गरगरत असतात. आपली पृथ्वीच सूर्याभोवती सेकंदाला तीस किलोमीटर या वेगाने भ्रमण करत असते आणि सबंध सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राला पंचवीस कोटी वर्षांत एक परिक्रमा करते.

अशा सगळय़ा गोष्टी आपल्याला ठाऊक असल्या तरी विश्वातील अनेक रहस्ये आपल्याला उलगडलेली नाहीत. विश्वनिर्मितीच्या तेरा अब्ज वर्षांच्या काळातला आपल्या ‘प्रगत’ संशोधनाचा काळ केवळ काल-परवाचा म्हणजे फार तर गेल्या चारेकशे वर्षांतला. त्याचा आरंभ गणिती पद्धतीने पूर्वी झाला असला तरी थेट उपकरणाच्या साहाय्याने विश्वाचा वेध घेण्याचा आरंभ १६०९ मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे केला. त्यानंतर आता अवकाशात पाठवलेल्या हबल आणि चंद्रा दुर्बिणींपर्यंत प्रगती झाली आहे.

त्यामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेचंही स्वरूप नीट समजत असून धनु राशीच्या पार्श्वभूमीवर सॅजिटेरियस-ए हे अतिविशाल कृष्णविवर आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असल्याचं लक्षात आलं आहे. आता तसंच दुसरं विशाल कृष्णविवर या केंद्रकाच्या ‘जवळच’ असल्याचं म्हटलं जातंय.

आता ‘जवळ’ म्हणजे नेमकं किती? याचं परिमाण आपल्या रोजच्या व्यवहारातल्या परिमाणांच्या कितीतरी वेगळं असतं. आपल्या सर्वात जवळचा तारा प्रॉग्झिमा सेन्टॉरी हा साडेचार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. आता एक ‘प्रकाशवर्ष’ म्हणजे ९४६० अब्ज किलोमीटर या न्यायाने गुणाकार करत बसावं लागेल. सर्वात जवळजी आकाशगंगा देवयानी याच परिमाणाने २२ लाख प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

हे जे नवं कृष्णविवर आकाशगंगेच्या केंद्रापाशी सापडलंय तेसुद्धा त्या केंद्रकापासून २०० प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचं म्हटलं जातं. या कृष्णविवराचा विस्तारसुद्धा १५० ट्रिलियन किलोमीटर इतका रुंद आहे. याचा अर्थ १५० वर १२ शून्य ठेवल्यानंतर जेवढे किलोमीटर होतील तेवढा हा आकार आहे!

इतक्या प्रचंड वस्तुमानाचं हे कृष्णविवर अतिप्रचंड गुरुत्वाकर्षणशक्ती असलेलं असणार हे उघडच आहे. एखाद्या ताऱयाच्या अंतानंतर त्याचं न्यूट्रॉन तारा, श्वेतखुजा किंवा कृष्णविवरात कधी रूपांतर होतं याचं संशोधन भौतिकशाश्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेले हिंदुस्थानी वंशाचे संशोधक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी केलं. आपल्या सूर्याच्या समाप्तीच्या वस्तुमानाच्या ३.४४ पेक्षा जास्त वस्तुमान एखाद्या संपुष्टात आलेल्या ताऱयाचं असेल तर ते कृष्णविवरात रूपांतर होणार असतं. कृष्णविवरांचा शोधच मुळी तिथून प्रकाशही परावर्तित होत नाही यातून लागला.

आता आपल्या दीर्घिकेच्या केंद्रकाजवळचं विशाल कृष्णविवर सापडल्याने संशोधनातला आणखी एक टप्पा गाठला गेला. आपल्या ‘आयुका’ संस्थेतील संशोधकांनी ‘सरस्वती’ हे दीर्घिकांचे सुपर-क्लस्टर शोधून अवकाश संशोधनातील आपली प्रगती यापूर्वीच अधोरेखित केली आहे. विज्ञान हाच उद्याचा ‘मंत्र’ आहे. मात्र तो सुज्ञपणे ‘जपला’ पाहिजे.