पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरावर ‘करणी’

199
pravin-pote-house

सामना प्रतिनिधी । अमरावती

अमरावतीतील राजकीय संघर्षात ‘बेशरम’ झाड रुजले असून त्या वादातूनच पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर ‘करणी’ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे पोटे यांच्या स्वीय सहाय्यकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचजणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या पाचजणांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

या ‘करणी’ प्रकरणामागे राजकीय वादाची भानामती आहे. बडनेरचे आमदार रवी राणा आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शहराच्या कल्याणनगर भागतील एका रस्त्यावरून हा संघर्ष पेटला आहे. रस्त्यासाठी निधी कोणी आणला यावरून वाद सुरू झाला आणि त्याची अखेर बेशरमाचे झाड लावण्यात झाली.

पोटेंची धावधाव

‘बेशरम’च्या झाडाची रुजवात होताच पालकमंत्री पोटे यांनी धावाधाव केली आणि स्वीय सहाय्यक अमोल काळे यांना पोलीस ठाण्यात पिटाळले. काळे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी युवा स्वाभिमानच्या पाचजणांविरुद्ध 11 डिसेंबरला गुन्हा दाखल केला आहे. जिह्यात सध्या या ‘करणी’चीच चर्चा सुरू आहे.

रवी राणा यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावू, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र तत्पूर्वीच राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोटे यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावले आणि साडीचोळीचा अहेरही दिला. या अहेरात बांगडय़ा, हळद-पिंजर आणि लिंबू-मिरचीही टाकण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या