काळे झगे आणि टोप्यांपासून ‘पदवीधरां’ची सुटका, विद्यापीठ आणणार हिंदुस्थानी पेहराव

836

पदवीदान समारंभात वापरण्यात येणारे काळे झगे आणि टोप्या ही तमाम पदवीधरांसाठी अप्रुपाची गोष्ट. पदवी अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवलेल्या किंवा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पोशाख करून फोटो काढायची संधी मिळते. मात्र, आता मुंबई विद्यापीठ या पेहरावात बदल करण्याच्या विचारात असून त्याजागी हिंदुस्थानी पेहराव आणण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. झग्यांचा निकृष्ट दर्जा तसंच उष्ण वातावरणामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या वापरात असलेल्या काळ्या झग्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो, तसंच टोप्यांचे आकारही डोक्याच्या मापाचे नसतात. त्यामुळे उष्ण आणि आर्द्र वातावरणात ते काचणारे झगे आणि सतत पडणाऱ्या टोप्या सांभाळणं विद्यार्थ्यांसाठी वैताग आणणारं असतं. त्या तुलनेने जर आर्द्र वातावरणासाठी योग्य अशा सुती कापडाचे आणि सुटसुटीत पेहराव आणले तर ते विद्यार्थ्यांच्या सोयीचं असणार आहे. हिंदुस्थानी पेहराव आणण्यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंपुढे मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासाठी तीन ते चार डिझाईन्सचे प्रस्ताव आले असून त्यापैकी एका पोशाखाची निवड केली जाणार आहे. साडी किंवा सलवार-कमीझ हा पोशाख विद्यार्थिनींसाठी तर कुर्ता-पायजमा हा पोशाख मुलांसाठी असू शकेल. मुंबई विद्यापीठच नव्हे तर अनेक विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांनीही यापूर्वी पदवीदान समारंभात वेगळे पोशाख ठेवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या