बिकट परिस्थितीच्या ‘ट्रॅक’वर ‘अडथळ्यांची शर्यत’, ठाण्यातला ‘ब्लेड रनर’ दुबई गाजवणार

16

सामना प्रतिनिधी । ठाणे

जन्मतः उजवा पाय आणि दोन्ही हातांची बोटे अर्धवट असूनही मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रणव देसाई या ठाणेकर धावपटूची जागतिक पॅराऍथलिट ग्रापी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दुबई येथे १० ते १७ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झालेला प्रणव हा ठाणेकर असून हिंदुस्थानातून या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे ‘ब्लेड रनर’ असलेल्या प्रणवच्या निवडीमुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला असला तरीही बिकट परिस्थितीच्या ‘ट्रक’वर धावताना त्याला ‘अडथळ्यांची शर्यत’ पार करावी लागत आहे.

ठाण्यातील माजिवडा येथील लोढा पॅरेडाइज गृहसंकुलात राहणारा प्रणव देसाई हा मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात अकरावीत शिकतो. प्रणव उजक्या पायाने अपंग असल्यामुळे ‘ब्लेड’च्या (कृत्रिम पाय) मदतीने धावतो. याआधी त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून ठाणे शहराचे नाव प्रकाशझोतात आणले आहे. नुकतीच कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅराअँथलिट स्पर्धेत प्रणवने खुल्या गटात दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. त्याचवेळी दुबई येथे होणाऱ्या दहाव्या फझ्झा जागतिक पॅराऍथलिट ग्रापी स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याची गोड बातमी समजल्याने देसाई कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र या स्पर्धेसाठी होणाऱ्या लाखभर रुपयांचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेने सध्या देसाई कुटुंबीय त्रस्त आहेत. एकीकडे क्रिकेटसारख्या महागडय़ा खेळाला प्रायोजक मिळत असतानाच भविष्यात पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासह पर्यायाने ठाण्याचे नाव चमकवण्यास सज्ज असलेल्या प्रणवला बळ देण्याची गरज आहे.

परिस्थितीशी संघर्ष
अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रणवची आई गृहिणी असून वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. त्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी मदत केली होती. त्यानंतर ठाणे पालिकेने त्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही त्याच्या दौऱ्याचा खर्च भागवण्यासाठी मदत मिळावी म्हणून प्रणवचे वडील प्रशासनाकडे खेटे मारत असल्याची खंत त्याचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली. प्रणवला मदत करण्यासाठी संपर्क – 8080088595.

आपली प्रतिक्रिया द्या