तरुण-तरुणी 10 दिवस ‘कैदेत’, बाहेर पडताच लगेच केले लग्न

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने तिथे कडक निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांमुळे तरुण तरुणीला 10 दिवस एकाच फ्लॅटमध्ये राहावं लागलं होतं. क्वारंटाईनचा काळ संपल्यानंतर तरुण तरुणी आपापल्या दिशेने निघून गेले. मात्र या 10 दिवसांत या दोघांमध्ये जे बंध विणले गेले ते घट्ट झाले होते. यामुळे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर या दोघांना विरह सहन होईनासा झाला, यामुळे या दोघांनी 26 डिसेंबर रोजी लग्न केलं.

चिनी प्रसार माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तर या जोडप्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाहीये. जवळपास 4 महिन्यांपूर्वी लोलो (बदललेलं नाव) आणि लाली (बदललेलं नाव) या दोघांची एका ब्लाईंड डेटवर ओळख झाली होती. ऑगस्ट महिन्यात लोला हा लालीच्या घरी गेला होता. जेव्हा या दोघांची भेट झाली तेव्हा देखील चीनमध्ये कोरोनाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे लोलोला लालीच्या घरात प्रवेश मिळाला खरा, मात्र त्याला तिथेच क्वारंटाईन व्हावं लागलं. क्वारंटाईनच्या या काळात लोलोने लालीच्या घरी जेवण बनवलं ज्याचे व्हिडीओ लालीने चित्रीत केले आहे. दोघांना एकमेकांशी बोलता आलं आणि एकमेकांना नीट जाणूनही घेता आलं. या दहा दिवसांच्या काळात दोघांनी एकमेकांना मिठ्या मारल्या ज्याचाही व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे. ज्यातून दोघांमधील बंध अधिक दृढ होत गेले.

क्वारंटाईन काळ संपल्यानंतर लोलो आपल्या घरी निघून गेला. मात्र त्याला सतत लालीची आठवण येत होती. लालीलाही लोलोची फार आठवण येत होती. यामुळे लालीने लोलोच्या घरी जाऊन त्याला भेटायचं ठरवलं होतं. लोलोला भेटायला गेलेली लाली त्याच्याच घरी राहिली आणि दोघांनी 26 डिसेंबरला लग्न उरकून टाकलं.