जन्मांध मनश्रीची उत्तुंग भरारी

140

<< प्रेरणा >>  प्रज्ञा घोगळे

जन्मतः अंध असलेल्या मनश्री उदय सोमणची यशोगाथा वाचताना तुमच्या डोळ्यांच्या पापण्यादेखील मिटणार नाहीत, अपंगत्वावर मात करून तिने गरुडासारखी झेप घेऊन यश मिळवलंय जे वाचून आपण आश्चर्याने थक्क व्हाल.

मनश्री जन्माला येताना काही शारीरिक व्यंगे घेऊन जन्माला आली. मनश्रीचा जन्म झाला तेव्हा तिच्या डोळ्यांची व मेंदूची वाढ नीट झालेली नव्हती. तिचा ओठ फाटलेला होता. तिच्या पाठीचे मणके व्यवस्थित नव्हते. मनश्रीला त्या परिस्थितीतही चांगले घडवावे म्हणून तिच्या आई अनिता सोमण या रडत बसल्या नाहीत. अनिता यांनी तिला वेगवेगळ्या प्रयत्नांनी चालण्यास शिकवले. तिला नर्सरीमध्ये घालून शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासाची तयारी करून घेतली. मनश्री जिज्ञासू, बुद्धिमान व चुणचुणीत होती. तिला एका शाळेत प्रवेश घेण्याआधी मुलाखत घेतली जाते, असे तिच्या पालकांनी तिला सांगितले. मात्र मुख्याध्यापक पालकांशी बोलत असताना; मनश्री उत्तरली माझी मुलाखत आहे तर मला कोणीच काही का विचारत नाही? त्यानंतर अनिता सोमण यांनी बोरिवलीतील “सुविद्यालय’’ या मराठी माध्यमाच्या सर्वसामान्य मुलांच्या शाळेत तिला प्रवेश मिळवून दिला. त्या शाळेचाही मनश्रीसारख्या विद्यार्थिनीला प्रवेश देण्याचा पहिलाच अनुभव होता. त्यांनी मनश्रीची शिशुवर्गातील आणि बालवर्गातील प्रगती तसेच ती इतर सर्वसामान्य मुलांसोबत कसे शिकते त्याचे निरीक्षण करण्याचे ठरवले. त्यानंतर तिला तिच्या प्रगतीप्रमाणे एकेक इयत्ता प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला. मात्र मनश्रीला तशी अडचण आलीच नाही. तिने पहिल्याच वर्षी संस्कृत पठण, श्लोक पठण, बालगीते यांसारख्या तोंडी स्पर्धांमध्ये शाळेला बक्षिसे मिळवून दिली. त्यामुळे मनश्रीबरोबर तिच्या शिक्षकांचा व अनिता सोमण यांचा आत्मविश्वास वाढला. ती पाचवीपर्यंत शिकत असताना तिच्या परीक्षांना लेखनिक म्हणून शाळेच्या शिपाई जायच्या. त्यानंतर मनश्रीने ‘सेंट झेवियर्स’ महाविद्यालयामधून कला शाखेतून पदवी मिळवली.

मनश्रीच्या जडणघडणीत ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) या संस्थेची  मदत झाली असल्याचे मनश्री सोमण यांनी सांगितले. अनिता यांनी मनश्री सर्वसामान्य मुलांसारखी शिकू शकते, वावरू शकते हे पाहून अंध मुलांसाठी ‘नॅब’मध्ये असलेला दीड महिन्याचा पॅरा प्रोफेशनल कोर्स केला. त्या कोर्सचा मनश्रीला घडवण्यात मोठा हातभार लागला. मनश्री पहिली-दुसरीला असताना ‘नॅब’ची शिक्षिका मनश्रीला शिकवण्यासाठी येत असे. मनश्रीला काडेपेटीच्या काड्या, आईस्क्रीमच्या काड्या, मण्यांची पाटी यांच्या साह्याने गणित शिकवले जाई. तिला एकदा शिकवलेले चटकन ध्यानात येई. मनश्री ‘नॅब’च्या कॅम्पमध्ये मल्लखांब शिकली. ती ‘नॅब’कडून चर्नी रोड येथील बालभवनात आयोजित केल्या जाणाऱ्या सुट्टीतील कॅम्पमध्ये भाग घेई. ती ‘बालभवन’च्या स्टेज शोमध्ये नाटक, नृत्य, गाणे अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे सभाधीट बनली. या संस्थेचा एकच उद्देश असायचा की, सर्वसामान्य मुलांप्रमाणे यांनीही पावसाचा अनुभव घ्यायला हवा. भिजलेल्या मातीचा सुगंध, चिखल उडवणं, पाण्यात भिजणं म्हणजेच इतर मुलांप्रमाणे याही मुलांनी खेळावं, बागडावं याकरिता ‘नॅब’ कडून ट्रेकिंग करता नेण्यात यायचे. मनश्रीने जीवदानी, सिंहगड अशा ठिकाणी ट्रेकिंग केले आहे. या संस्थेतून मनश्रीने १० वर्षे खूप मज्जा केली असल्याचे सांगितले.

मनश्रीने शिक्षणाव्यतिरिक्त स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करावे म्हणून अनिता यांनी तिला अस्मिता कुलकर्णी यांच्याकडे मनश्री सोमण ही चौथीला असताना कॅसिओ शिकण्याकरता पाठवले. त्यावेळी ती इतर मुला – मुलींप्रमाणे गुणगुणत असे आणि तिच्या आवाजात एक वेगळाच गोडवा तिच्या शिक्षिका अस्मिता यांना जाणवला. त्यांनी मनश्रीला तू गात का नाहीस असा प्रश्न केला. तुझ्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे आणि तू गाऊ शकतेस असे सांगितले, असा विश्वास मनश्रीला मिळाला. तिने गाणं शिकण्यास सुरुवात केली तोपर्यंत मनश्रीच्या फाटलेल्या ओठाचे ऑपरेशन झाले होते. ती मानसी देसाई यांच्याकडे शास्त्र्ााrय संगीत, तर सुचित्रा भागवत व माधव भागवत यांच्याकडून २०१५ पासून गजल गायनाचे धडे घेत असून लाईट म्युझिकदेखील शिकत आहे. याचबरोबर मनश्री सध्या जर्मन भाषाही शिकत आहे.

मनश्रीने संभाजीनगरमधील ‘हेडगेवार रुग्णालया’ मधील रुग्णांसाठी मॅरेथॉनमध्ये धावते. ती एका मॅरेथॉनमध्ये ७ किलोमीटर धावली होती. मनश्रीचा ‘मुंबई महानगरपालिके’कडून निवडल्या गेलेल्या नऊ दुर्गांमध्ये समावेश करण्यात आला होता. तिचा ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’कडून सत्कार करण्यात आला आहे. तसेच ती सातवीला असताना राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून तिला “बालश्री’’ सारखा अत्युच्च पुरस्कार मिळवूनही तिच्यातला साधेपणा तसाच राहिला हे विशेष आहे. तसेच सध्या धावण्याचा सराव तिची आई तिच्याकडून अजूनही करून घेत असल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर तिने एकदा कश्मीर दाल लेक येथे पहिल्यांदा वॉटर स्किट केले होते. तिला त्याचा अनुभव घ्यायचा होता आणि तो अनुभव तिने खूप छान प्रकारे हाताळला असे ती सांगते.

मनश्रीची मैत्रीण उम्मेहानी बगस्त्रीवाला यांनी ‘प्लर्स ऑफ व्हिजन’ नावाचा समूह स्थापन केला आहे. या समूहाच्या माध्यमातून तिने अंधांना रायटर्स उपलब्ध करून दिले. अनेक अपंग मुलांना परीक्षा तोंडावर आली तरी रायटर्स शोधावे लागतात. त्यामुळे हा समूह माझ्या मैत्रिणीने केला असून मी त्या समूहालादेखील जॉईंट झाल्याचे सांगते. सध्या मनश्रीr बँकेच्या परीक्षा देत असून रोज सकाळी एक तास गजलचा सरावदेखील करते. आम्ही अंध, अपंग असलो म्हणून आम्ही काही करू शकत नाही असे नाही. सध्या आमच्यासारखेच उच्च शिक्षण व नोकऱया मिळवत आहेत. त्यामुळे आम्हाला कमी लेखू नका किंवा आम्हाला सहानभूती न दाखवता आमच्यातल टॅलेंट पाहा असे मी सांगू इच्छिते. तसेच मला आजवर मिळालेले यश यामागे माझे बालरोगतज्ञ चारू सरैया यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी माझ्या कुटुंबाला खूप मोठा आधार दिला आहे. त्याचबरोबर माझे आई, वडील, ताई, आजोबा, शाळा आणि मित्र-मैत्रिणींमुळे मला हे यश मिळाले आहे असे मनश्रीने सांगितले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या