व्हॉट्सअॅप ग्रुपवरून ब्लॉक केले म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या

1002
प्रातिनिधिक

व्हॉट्सअॅपवरील कॉलेजच्या वर्गमित्रांच्या ग्रुपवरून ब्लॉक केलं म्हणून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याच्या मित्रांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. ग्रुपमधील त्याच्या वर्गमित्रांनीच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वसई येथे पालकां सोबत राहणारा जय (नाव बदलले आहे) हा सांताक्रूझ येथील एका महाविद्यालयात बॅचलर ऑफ मास मीडियाचे शिक्षण घेत होता. त्याच्या वर्गमित्रांनी जुलै 2019 मध्ये ‘नमुने’ नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपवर जयला बऱ्याचदा चिडवलं जायचं, त्याची खिल्ली उडवली जायची. अनेकदा ग्रुपवर होणाऱ्या अश्लील संभाषणांवर जय आक्षेप घ्यायचा. त्यावरून देखील जयला घालून पाडून बोललं जायचं व त्यानंतर बऱ्याचदा जयला ग्रुपवरून काढून टाकले जायचे. त्यानंतर जय त्याच्या मित्रांकडे पुन्हा ग्रुपमध्ये घेण्यासाठी विनंती करायचा. मात्र त्याचे मित्र जेव्हा त्याची गरज लागेल तेव्हाच त्याला ग्रुपमध्ये घ्यायचे. त्याचे मित्र अनेकदा त्याच्याकडून त्यांचे प्रोजेक्ट्स देखील बनवून घ्यायचे. मित्रांचे प्रोजेक्ट्स व्यवस्थित बनवून देता यावेत यासाठी जय अॅनिमेशनचे धडे घेत होता.

गेल्या दोन आठवड्यांपासून जय कॉलेजला जायला नकार द्यायचा असे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. ‘आम्ही सतत त्याला कॉलेजला न जाण्याचे कारण विचारायचो. कुणी त्याला त्रास देतेय का याबाबतही विचारले मात्र त्याने कधीच आम्हाला काही सांगितले नाही. तो गप्प गप्पच असायचा. त्यातच त्याला गेल्या काही दिवसांपासून ताप होता. मात्र तो असं काही करेल असे आमच्या ध्यानी मनी देखील आले नव्हते’, असे जयच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र पोलीस यात घातपात किंवा जयचा त्याच्या मित्रां कडून मानसिक छळ होत होता का याचा देखील तपास करत आहेत. पोलिसांनी जयचा फोन ताब्यात घेतला असून त्यातून खरी परिस्थिती समोर येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या