ब्लॉग : सातच्या आत घरात!

291

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

चांगल्या गोष्टी जगाला ओरडून सांगाव्या लागतात, पण वाईट गोष्टी…न सांगताही चटकन कळतात. आमच्या वसाहतीतलं संस्कारी, सुसंस्कृत, आदर्श मानलं जाणारं शुभांगीचं कुटुंबं एकाएकी दृष्टावलं. गेल्या सोमवारी त्यांच्या घरात, कधी नव्हे ते कडक्याचं भांडण झालं. आवाज ऐकून वसाहतीतले सगळे त्यांच्या विंगेजवळ गोळा झाले. पण नवरा-बायकोच्या वादात तोंड घालण्याचं धारिष्ट्य कोणी केलं नाही. एक-दीड तासाने भांडणाची तीव्रता कमी झाली, पण त्या आदर्श घराला गालबोट लागलं.

चार दिवसांनी शुभांगी बाजारात भेटली. आमची चांगली मैत्री असल्याने, त्या दिवशीच्या भांडणाबद्दल मी तिला थेट विचारलं….तर कारण होतं, अविनाशचं प्रमोशन! अशा आनंदाच्या बातमीवर भांडणाचं विरजण का पडलं असेल, ह्या विचाराने माझी उत्सुकता चाळवली. जवळच्या एका बागेत आम्ही अर्धा तास गप्पा मारत बसलो. प्रमोशन हा वादाचा मुद्दा नव्हता, तर वाढत्या कामामुळे अविनाशची व्यस्त झालेली दिनचर्या, हा मुद्दा होता.

अविनाशचं कुटुंबं मध्यमवर्गीय. शुभांगीच्या घरची परिस्थितीही बेताचीच. पण दोघे हुशार आणि उच्चशिक्षित! लग्नानंतर कनक झाल्यावर शुभांगीने नोकरी सोडली होती. अविनाशला त्याच्या मेहनतीवर प्रमोशन मिळत होतं. लक्ष्मी घरात पाणी भरू लागली. कुबेर महाराज प्रसन्न झाले. ऐहिक सुख लोळण घेऊ लागलं, पण मानसिक सुख हरवू लागलं. चिन्मयच्या जन्मानंतर तर अविनाशच्या पायाला भिंगरीच लागली. मुलांच्या भवितव्यासाठी तो रात्रंदिवस गधड मेहनत करू लागला. त्याची तब्येत खालावत होती. शुभांगीची काळजी वाढत होती.

नवऱ्याला प्रमोशन मिळतंय, याचा शुभांगीला आनंदच होता, पण आपला नवरा आपला न वाटता, कंपनीने विकत घेतलेला यंत्रमानव बनतोय, याचं तिला दुःख होतं. अविनाश ऑफिस मिटिंगसाठी वरचेवर बाहेरगावी जाऊ लागला. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात कोणी ‘शन्या’ तर शिरली नाही नं, या भीतीने शुभांगी अविनाशचे फोन कॉल्स, मेसेज तपासू लागली. दोघांच्या गोड नात्याला संशयाची वाळवी पोखरू लागली. अशात अविनाशने पुन्हा प्रमोशनची घोषणा केली. त्यावर नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांच्यात कडक्याच भांडण झालं.

दुसऱ्या दिवशी अविनाशचे आई-बाबा आले. शुभांगीने सदर परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. त्या सायंकाळी पुन्हा कडाक्याचं भांडण झालं.पण यावेळी आवाज फक्त सासू सासऱ्यांचा होता. ‘नोकरीमुळे तुला कौटुंबिक सुखाला मुकावं लागत असेल तर सोड ती नोकरी! बघावं तेव्हा ऑफिस ऑफिस ऑफिस. हे घर, हा संसार एकट्या सूनबाईंनी संभाळायचा का? सकाळी लवकर निघायचं, घरी उशिरा यायचं, आल्यावर मोबाईल नाहीतर कॉम्प्युटरमध्ये डोकं खुपसून बसायचं. मुलांचं बालपण कधी जगशील? बायकोशी सुसंवाद कधी साधशील? ऑफिसच्या चार भिंतीबाहेर असलेली दुनिया कधी पाहशील? आमच्या सारखा म्हातारा झाल्यावर? तुमच्या पिढीचं म्हातारपण तर ऐन चाळीशीत सुरू होणारे, मग कधी जगशील स्वतःसाठी? वेळेत सावर. कुठे थांबावं हे कळलं नाही, तर सोन्यासारखं आयुष्य गमावून बसशील.’

काका-काकूंचं बोलणं ऐकून शुभांगीच नाही, तर भांडणाचा आवाज ऐकून त्यांच्या घराखाली जमलेल्या वसाहतीतल्या समवयस्क मुलीसुद्धा सुखावल्या. आपापल्या नवऱ्याच्या कमरेत कोपर खोचत ‘लेका बोले, जावया लागे’ ह्याची जाणीव त्या करून देऊ लागल्या. भांडण थांबलं. काही क्षण पिन ड्रॉप सायलेन्समध्ये गेले. अविनाशने आई, बाबा, शुभांगी आणि मुलांची माफी मागितली. प्रमोशन नाकारणार आणि नियमित वेळेत घरी आल्यावर फोन बंद ठेवून कुटुंबाला वेळ देणार अशी कबुली दिली.

त्याचं बोलणं तोडत शुभांगी म्हणाली, ‘तुझ्या प्रगतीचं आम्हा सर्वांना कौतुक आहे अविनाश, पण पैसा सबकुछ नसतो रे. आधीच्या पगारातही आपलं सगळं भागत होतंच की! उलट आतापेक्षा जास्त मौज-मजा करत होतो. पण तू ‘आपल्या’ विश्वातून ‘तुझ्या’ विश्वात कधी गेलास, हे तुझं तुलाही कळलं नाही. मुलं तुझी वाट पाहत झोपी जातात. मी आपल्या सहवासासाठी झुरते. आई-बाबा तुझ्या फोनची वाट पाहतात. तू सगळे कष्ट आमच्यासाठी घेतोस कबूल आहे, पण ह्यात तू हरवता कामा नये, एवढच आमचं म्हणणं आहे. तू घे प्रमोशन. फक्त थोडं वेळेचं नियोजन कर, कामाबरोबरच थोडा वेळ आम्हाला दे, थोडा स्वतःला दे. कारण, गेलेले क्षण परत मिळणार नाही, कधीच नाही.’

घरातून आवाज येणं बंद झालं. लोक आपापल्या घरी गेले. श्रावणी सोमवारचा दिवस उजाडला. शुभांगी सकाळी शंकर मंदिरात जाऊन शिवामूठ वाहून आली. ‘नावडतीची आवडती होऊ दे रे देवा’, अशी प्रार्थनाही करून आली आणि काय आश्चर्य…महादेव पावला…तिचा भोळा सांब त्या संध्याकाळी सातच्या आत घरात परत आला!’

summary- blog by jyotsna gadgil on family time

आपली प्रतिक्रिया द्या