ब्लॉग: हिरव्या शेंगदाण्यांचे लाडू!

138

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

बाळाला जसा आई आणि दाईतला फरक कळतो, तसा घरातल्या प्रत्येकाला किचनमध्ये आलेला, दुसऱ्याचा कालथा, डबा, वाटी, चमचा एका दृष्टीक्षेपात कळतो. काल संध्याकाळी असाच एक पितळी डबा आमच्या स्वयंपाकघराच्या फळीवर विराजमान झाला. मी लेगच त्या अनोळखी डब्याची आईकडून ओळख पटवून घेतली. ‘तुझ्या निर्मला काकूंनी डबा दिलाय, शेंगदाणा कुटाच्या लाडवांचा!’ असं आईकडून उत्तर आलं आणि मी आधाशासारखी डब्यावर तुटून पडले. झाकण उघडलं. डोळ्याचं पारणं फिटलं. त्यातला एक लाडू उचलणार, तोच आई म्हणाली, ‘उद्या सकाळी नैवेद्य दाखवल्यावर खा, नाहीतर ऑफिसला जाताना घेऊन जा.’ जड अंत:करणाने झाकण लावलं आणि थँक यु म्हणण्यासाठी काकूंना फोन लावला.
‘काकूsss, मस्त झालेत लाडू. अजून खाल्ले नाहीत, पण बघूनच चव कळतीये. थँक यु सोsss मच!’
‘आवडले का? बर बर, पण हेच थँक यु प्रत्यक्ष भेटून म्हटलं असतं तर जास्त आवडलं असतं. उद्या ऑफिसला जाताना भेटून जा.’
‘बरं काकू, सकाळीच येते.’
दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने शंकराला बेल, लाल फुलं वाहून लाडवाचा नैवेद्य दाखवला आणि स्वहस्ते एक लाडू स्वतःच्या तळहातावर टेकवला. साधा शेंगदाण्याचा लाडू, पण किती ते परफेक्शन! निग्रहाने दुसऱ्या लाडवाकडे पाठ वळवत मी ऑफिसला जाण्याआधी काकूंचं घर गाठलं.
‘ये ये ये, कित्ती बरं वाटलं प्रत्यक्ष भेटून. मेसेज-फोन वर ही मजा नाही. हो किनी?’
‘अगदी बरोब्बर! काकू, लाडू नेहमीप्रमाणे मस्त झालेत.’
‘आवडले नं? माहीत होतं मला! अगं कधीचे करीन करीन म्हणते, राहूनच जातं. शेंगदाणे आणून दीड महिना झाला, हिरवे व्हायला लागले, म्हटलं आता करूनच टाकते.’
हिरवे शेंगदाणे ऐकून मी काळी-निळी पडले. आवंढा गिळून काकुंकडे खोटी स्माईल देत, ‘येते’ म्हटलं.
‘चहा घेतल्याशिवाय काही मी तुला सोडत नाही. परवाचं दूध अजून शिल्लक आहे. बस, पटकन चहा टाकते. काकाही घेतील थोडा.’
‘काकू नको, घरून चहा घेऊनच बाहेर पडले.’
‘अग मग कोकम सरबत तरी घे. काकांनी आणलंय कोकणातून. दोन वर्षं झाली, तरी अजून मस्त चव लागते.’
‘काकू खरंच नको. आल्याप्रमाणे पेलाभर पाणी द्या.’
‘बरं आत ये. बाकी काय म्हणतेस. नोकरी कशी चाललीये?’
‘एकदम छान. हल्ली ते बायोमेट्रिक केलंय नं, ऑफिस वेळेत गाठावं लागतं.
‘जाशील गं. एवढी कसली ती घाई? आमचा बघ वेळ जाता जात नाही. घरात दोघच असल्याने पाणीसुद्धा एकदा भरलं की आठवडाभर पुरतं.’
‘….. अं…काकू येऊ मी? नंतर फुरसतीत येईन कधीतरी.’
‘अशी घोड्यावरून काय आलीस, पुढच्या वेळी कोणतीही कारण खपवून घेणार नाही. आज उपास असेल नं, सलूने आणलेला खोबरेपाक खाऊन जा. ही घे वडी, आवडली तर आणखी घे हो.’
‘काल सलू ताई आलेली का? बोलला असतात, तर कालच येऊन भेटून गेले असते.’
‘छे गं, ती गेल्या महिन्यात आलेली, तेव्हाच वड्या आणलेल्या.’
‘गेल्या महिन्यात??? काकू मी पळते. खूपच उशीर झालाय.’
‘बरं बरं सावकाश जा. पुढच्या आठवड्यात मी पोह्यांचा चिवडा करेन म्हणते. पाठवीन तुला. दिवाळीपासून पोहे नुसते पडून आहेत. छान भाजून घेतले, की कुरकुरीत चिवडा होईल.’
‘बस काकू, आणखी रेसिपीचं नाव काढू नका! नुसत्या विचारानेही उपास तुटेल. पळते….’
‘थ्री इडियट्स’ मधली ‘खुजली वाली रोटी’ आठवत, त्या क्षणापासून परान्नाचा त्याग करण्याचा निश्चय केला आणि तिथून धूम ठोकली.

summary- blog by jyotsna gadgil on stale food

आपली प्रतिक्रिया द्या