#WorldEnvironmentDay हिंदुस्थानी वन्यजीवन – एक खजिना, एक अनुभव!

6522

>> दक्षा बापट

हिंदुस्थानी वन्यजीवन हे फार समृद्ध आहे. आपल्या हिंदुस्थानातच समुद्राच्या पाण्यातील विविध प्रकारचे 340 सस्तन प्राणी, 1200 पक्षी, 420 सरपटणारे प्राणी, 140 उभयचर प्राणी, 2000 मासे आढळून येतात. हिंदुस्थानात विविध जंगले आहेत. आपल्याकडे 597 संरक्षित क्षेत्रे स्थापन केली आहेत. ज्यामध्ये 103 राष्ट्रीय उद्याने, 535 वन्यजीव अभयारण्ये, 2 संरक्षण प्रकल्प असून त्यात 1.66 दशलक्ष हेक्टर क्षेत्र किंवा 75.7575 टक्के भौगोलिक क्षेत्र आहे. हिमालयीन प्रदेशापासून ते उष्ण कटिबंधीय प्रदेशातील जंगलांपर्यंत वैविध्यता पहायला मिळते. जगातील एकमेव भारत देश असा आहे की जिथे सिंह आणि वाघ एकाच जंगलात राहतात. हिंदुस्थानी जंगलांमध्ये हरणांची तसंच वाघांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. हिंदुस्थानी उपखंडातील स्वदेशी म्हणजे हिंदुस्थानी स्लोथ बियर, चौसिंग मृग आणि राजसी बारसिंगा या वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहेत. यात बंगाल आणि इंडोचिन वाघ, एशियाटिक सिंह, हिंदुस्थानी आणि इंडोचिन बिबट्या, हिम बिबळ्या, ढगाळ बिबट्या,चितळ, बारासिंगासह मृगांच्या विविध प्रजाती आहेत; हिंदुस्थानी हत्ती, महान हिंदुस्थानी गेंडा आणि इतर बरेच वन्य प्राणी आहेत.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे हिंदुस्थानातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे आणि संकटात सापडलेल्या बंगाल वाघाच्या संरक्षणासाठी हेली राष्ट्रीय उद्यान म्हणून 1936 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. जंगलाचा मुख्य भाग दक्षिणेकडे बाह्य हिमालयीन किंवा शिवालिक भागात पडतो. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क या जंगलात झोन्स आहेत. त्यातील ढिकाला हा माझा आवडता आणि अतिशय सुंदर झोन आहे. जंगलाच्या मधोमध रामगंगा नावांची सुंदर नदी वाहते. ह्या नदीतील पाणी अगदी निळंशार दिसते. या जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक वन्य प्राणी आहेत. हत्ती, वाघ, बिबट्या, विविध हरणं – चितळ, सांबर, भेकड, दुर्मिळ असा हॉग डियर इथं आहेत. इथं अनेक सुंदर सुंदर पक्षी देखील आहेत. या जंगलात मुख्यतः साल वृक्ष आहेत. इथली लँडस्केप फार अप्रतिम आहेत. इथं वाघ मिळणं दुर्मिळ पण दिसला तर मन भरून जाते. रामगंगा नदीत हत्ती मनसोक्त आनंद लुटतात. माणूस जसं अंघोळ झाल्यावर पावडर लावतो, तस हत्ती देखील अंघोळ झाल्यावर डस्ट बाथिंग करतात म्हणजे काय तर नदी किनाऱ्यावरील मऊ माती आपल्या अंगावर उडवतात. अतिशय नयनरम्य असं हे दृश्य असते. आपल्या जंगलातील हे वैभव आपल्यालाच जपायचे आणि सांभाळायचे आहे. ती आपली जबाबदारी आहे.

हिंदुस्थानामध्ये अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच, कान्हा, बांधवगढ़, डांडेली अशी राष्ट्रीय उद्याने आहेत. नागरहोले, रणथंभोर, सुंदरबन, पन्ना, सातपुडा हे खास वाघांसाठी संरक्षित आहेत. ताडोबा हा महाराष्ट्रातील माझा आवडता व्याघ्र प्रकल्प आहे.एकदा आम्ही असच ताडोबा फिरायला गेलो होतो.थंडी मध्ये जंगले बघायची मज्जाच वेगळी असते. आम्ही अनेक दिवस फिरत होतो. या दरम्यान आम्ही एक वाघीण आणि तिचे 2 बछडे बघितले. पण अजून ‘माया’ला बघायचा योग आला नव्हता. आता तुम्ही म्हणाल की ही ‘माया’ कोण? तर ताडोबा मधील सेलिब्रिटी किंवा स्टार वाघीण म्हणजेच माया असं म्हणू शकतो. तिचे हे माया नाव येथील ड्रायव्हर आणि गाईड लोकांनी ठेवले आहे. ताडोबा इथे 1 जानेवारी 2017 रोजी ही आमची शेवटची 14 वी सफारी होती. आमचे मार्गदर्शक प्रवीण जांभुळे यांनी आज मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही प्रथम हिल टॉप रस्ता तपासला आणि पांढरपौनी भागात गेलो नाही. पण आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अचानक वाघीण माया आपला प्रदेश चिन्हांकित करीत पुढे निघाली होती हे पाहून आम्ही थक्क झालो. धैर्य आणि कठोर परिश्रम फलदायी ठरले होते. तिला पाहणे हा एक अत्यंत आनंदाचा क्षण होता… आणि आज कळलं कि तिला माया का म्हणतात. आज कृतकृत्य झाल्याची भावना मनात दाटून आली. कितीही गाड्या असल्या तरी ती अगदी ऐटीत तिच्या रूबाबातच चालते, आपल्याला आकर्षित करून स्वत:च खूप सुंदर फोटोग्राफ्स देते.

मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्प हे एक महत्वाचे अभयारण्य आहे. माझ्या आयुष्यातील पाहिला बिबट्या व वाघ मी याच जंगलात पहिला. पण या जंगलात वाघ पाहणं हे फार दुर्मिळ आहे. वन्यजीव छायाचित्रण करताना परकोटीचा संयम अत्यावश्यक ठरतो. 24 एप्रिल 2018 रोजी पहाटे सफारीला निघालो. एप्रिल महिन्यात एवढी थंडी होती…प्रचंड हुडहुडी भरत होती. कान्हा झोन मध्ये फिरत होतो. तब्बल दीड तास वाट पहिली. तेवढ्यात ‘नयना’ ही वाघीण गवताच्या कुरणातून बाहेर आली. तिच्या 4 बछड्यांसह आणि रस्ता ओलांडून जंगलाच्या दुसऱ्या भागात निघून गेली. नंतर खूप आनंदात आम्ही नाश्ता तर अवघ्या 10 मिनिटात उरकून परत सफारी ट्रॅकवर आलो. रूट वरून जात असताना आमचे ड्रायव्हर नरेशजींना रस्त्याच्या मधोमध वाघीण उभी दिसली. काही क्षणातच लक्ष्यात आलं कि ही वाघीण शिकार करणार. कान्हाच्या जंगलामध्ये मोठी आणि उंच सालाची वृक्ष आहेत. आता त्या वाघिणीने रस्त्याच्या डाव्याबाजूला झाडीत नजर रोखली होती. तिने अत्यंत सावधपणे दबा धरला होता…आम्ही कॅमेरा वाघिणीच्या दिशेने रोखलेला आणि क्षणाच तिने झाडीत झेप घेतली, एक चितळ हरीण झुडपातून थेट रस्त्याच्या दिशेने धावले. पण वाघीण ही एक उत्तम शिकारी होती. तिने डोळ्याचे पाते लावते न लावते तोच हरणावर झडप घातली तिच्या जबड्यात हरीण जखडले गेले… अंगावर काटा आणणारा हा प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. ही वाघिणीची अत्यंत थरारक शिकार पाहायला मिळाली हे आमचे नशीबच.

आज सफारीला निघालो आहोत काबिनी नागरहोल नॅशनल पार्कमध्ये. नागरहोल हे हिंदुस्थानातील कर्नाटक राज्यातील कोडागू आणि म्हैसूरच्या मधे आहे. याच जंगलात अतिशय दुर्मिळ असा ब्लॅक पॅन्थर आढळतो. 25 फेब्रुवारी 2020 रोजी आमची सकाळची शेवटची आणि चौथी सफारी होती. आज जंगलातील वातावरण नेहमी सारखे नव्हते, त्याने गर्द धुक्याची चादर पांघरली होती. पक्षांचे सुरेल गायन सुरू होते. दोन तीन पाणवठे बघितले. एवढ्यातच पुढच्या पाणवठ्यावर दुरूनच एक वाघ दिसला. आम्ही हळू हळू पुढे गेलो, तर एक नाही, दोन नाही तर तब्बल 4 वाघ होते. एक वाघीण आणि तिचे 3 बछडे आपली तहान भागवत होते. हा क्षण पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे.

इथून पुढे निघालो. आता मात्र ब्लॅक पँथरच्या भागात गाडी नेली. आता ह्या भागात आमची एकच गाडी होती. वाटेत एका गव्याने रस्ता ओलांडला. पक्षांचा किलबिलाट ऐकत थांबलो होतो. एवढ्यात भेकर (बार्किंग डियर)ने अलार्म कॉल दिला. लोकेशजी आमचे ड्रायव्हर आणि गाईड होते. त्यांनी गाडी हळूच मागे घेतली. आता लंगूर आणि चितळ पण ओरडू लागले. लक्ष पूर्ण झाडीत होते. इतक्यातच झाडीतून काहीतरी काळं बाहेर येताना दिसलं… आणि तेवढ्यात कुणी तरी ओरडले, अरे ब्लॅक पॅन्थर.. आणि जगातील अतिशय दुर्मिळ असा मेलेनिस्टिक बिबटया आर्थात ब्लॅक पॅन्थर आमच्या नजरेस पडला. काबिनी जंगलातील हा साया उन्हाच्या प्रकाशात चमकत ऐटीत पुढे निघाला, आम्ही जमतील तसे भराभर फोटो काढले…दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाले होते.

जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला सतत सतर्क राहावे लागते. वाघ किंवा कोणताही वन्य प्राणी हे एक तर अगदी भल्या पहाटे किंवा मग सूर्यास्ताला जास्त सक्रिय असतात. असंच एकदा आम्ही ताडोबाच्या बफर झोनमध्ये फिरत होतो. संध्याकाळचे 5.30 झाले असावेत. खूप अंधार पडायला लागला होता. गेट अगदी जवळ होते, इतक्याच मला एक वाघीण अगदी संथगतीने रस्त्याच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाताना दिसली. मी ड्रायव्हरला लगेच गाडी थांबवायला सांगितली आणि म्हटलं, अरे ते बघा वाघ…!! जंगलात फिरत असताना सतर्क राहण्याची आश्यकता असते. अचानक समोर काय येईल हे सांगता येत नाही. असेच ताडोबाच्या बफरमध्ये देखील आम्ही वाघ बघितला. प्रत्येक वेळी अलार्म कॉल किंवा हरीण ओरडेलच असे नाही. पण एक मात्र नक्की जंगलात फिरताना एकदम शांत राहिले पाहिजे म्हणजे प्रत्येक आवाज, प्रत्येक सूक्ष्म वाटणारी हालचाल देखील आपल्याला टिपता येते.

हिंदुस्थानामध्ये अनेक पक्षी अभयारण्ये देखील आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील आहेत. त्यात उजनी धरणाच्या बॅकवॉटर्सला वसलेला भिगवण हा परिसर स्थलांतरीत पक्ष्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. दर वर्षी थंडीमध्ये इथे ग्रेटर फ्लॅमिंगोस, बार हेडेड गूस, ब्लॅकटेल गॉडविट,नॉर्दर्न शोव्हलर असे एक ना अनेक सुंदर सुंदर पक्षी इथे पाहायला मिळतात. भिगवणला महाराष्ट्रातील भरतपूर असंही म्हणतात.गीर राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आहे. हे हिंदुस्थानातील आशियाई सिंहांचे एकमेव घर आहे. सरकारने 1960 पासून इथं शिकार करण्यास पूर्णपणे बंदी घातली. उर्वरित सिंहांचे संवर्धन झाले. हे आशिया खंडातील सर्वात महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. सर्व अडथळ्यांशी लढल्यानंतर इथं सिंहांची संख्या आता बऱ्यापैकी वाढली आहे.

शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे. आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर तसेच महाबळेश्वरच्या जंगलामध्ये शेकरू आढळून येतो. हरियाल हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ आहे. सुमारे दशकांपूर्वी संशोधक आणि स्थानिक निसर्ग उत्साहींनी आंबोलीच्या जंगलांचा शोध सुरू केला. आज, अंबोली हर्पेटोफाउना (सरपटणारे प्राणी आणि उभयचर)च्या विपुल प्रमाणात प्रचलित आहे. गंभीरपणे धोक्यात आलेली प्रजाती अंबोली टायगर टॉड आणि स्थानिक अंबोली बुश फ्रॉग इथे आहेत. जंगलात फिरताना केवळ मोठे वन्य प्राणीच नव्हेत तर विविधप्रकारचे पक्षी, हरणं, माकडं अशा सर्वांचेच फ़ोटोग्राफ करण्याचा माझा मानस असतो. माझा नॅशनल जिओग्राफिक युअर शॉटसाठी निवडलेला फोटो हा एक गव्याचा आणि मैनेच्यातील संवादाचा फोटो आहे. यात ना वाघ आहे, ना बिबट्या पण तरी देखील त्यांच्यातील संवादामुळे न बोलताच एक सुंदर कथा आपण सांगू शकतो. मला वाटत फोटो हा असाच असला पाहिजे. आपला फोटो आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलला पाहिजे.

आपल्या इथे अनेक गैरसमज आहेत कि जंगलात फिरत असताना वाघ आपल्यावर हल्ला करतो. खरंतर वाघ हा एकदम शांत जनावर आहे. तुम्ही जर लांबून त्याला शांतपणे बघितल तर तोही त्याच्या रस्त्याने शांतपणे निघून जातो. तो तुम्हाला काहीच करत नाही. जंगलात एक महत्त्वाचे म्हणजे माणसाने हे विसरता काम नये की आपण वाघाच्या जंगलात जात आहोत. तो आपल्या घरात येत नाहीये. जंगलात फिरतानाचा महत्वाचा नियम म्हणजे शांत राहणे. वाघ किंवा कोणत्याही वन्यजीवास शांतपणे पाहायचे. आरडा ओरडा करायचा नाही.

आपण सगळ्यांनीच आपले हे वैभव जपायला हवे. झाडांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, संवर्धन करूयात. अनेक जंगले ही आपल्या भूमीची फुफ्फुसे आहेत. ती हवा शुद्ध करतात आणि आपल्याला ताजेतवाने करून सामर्थ्य देतात. हवामान बदल वास्तविक आहे.विकासाच्या नावाखाली अनेक जंगले तोडली जात आहेत. आज आपण ऐकत असाल की मानवी वस्ती मध्ये बिबट्या, अस्वल, वाघ ह्यांचा शिरकाव वाढला आहे. पण असे का होत आहे ?? माणसाने आरक्षित जंगलात शिरकाव थांबवला पाहिजे. प्राण्यांना त्यांच्या अधिवासात राहू देत. वन आधारित उत्पादनांची वाढती मागणी आणि परिणामी जंगलतोड तसंच अतिक्रमण यामुळे नैसर्गिक साधनसामुग्रीचे प्रचंड नुकसान झाले. कित्येक जंगल नष्ट झालीत. आपण पिढीसाठी जंगलांचे संरक्षण केले पाहिजे. पक्षी, प्राणी आणि झाडे स्वतःसाठी बोलू शकत नाहीत. त्यांच्यासाठी आपण जंगलांचे संरक्षण केले पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर कमी करूया. पृथ्वीसाठी प्लॅस्टिक अतिशय घातक आहे. प्रदूषण थांबवणे हा ह्या सगळ्यावरचा एक उत्तम उपाय आहे..

पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला आपल्या इतकाच येथे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. जंगल हे आपल्यासाठी साधन नाही, तर ते जीवन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या